धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 September 2022

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

नागपूर  :   कोविड महामारीनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 66 वा वर्धापन दिन व्यापक प्रमाणात साजरा होणार असून, त्यासाठी शहरात लाखो भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली.


नागपूर येथील दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शासनाच्या विविध विभागांनी यासाठी करावयाच्या कार्यवाहीचे नियोजन केले असून, त्याचा या बैठकीत विस्ताराने आढावा घेण्यात आला. श्रीमती बिदरी-प्रसन्ना यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,  अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपायुक्त आशा पठाण, माहिती संचालक हेमराज बागुल, पोलीस उपायुक्त चेतना तिडके, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांच्यासह विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


 दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस येथे तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान लाखो अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी दीक्षाभूमी येथे महानगरपालिकेने झोनल अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली शुद्ध पाणीपुरवठा, अखंडित वीज पुरवठा करावा. आवश्यकतेनुसार स्टँडपोस्ट, टँकर व पीव्हीसी पाईपची व्यवस्था करावी. तसेच दीक्षाभूमी परिसरातील साफसफाई व स्वच्छतेसंबंधी योग्य ती काळजी घेण्याबाबत श्रीमती बिदरी यांनी आदेश दिले.


            फिरते रुग्णालय व शौचालयांची व्यवस्था करावी.  अंबाझरी व फुटाळा तलावावर सुरक्षारक्षक बोटीसह‍ यंत्रणा सज्ज ठेवावी, या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असल्याची खात्री करावी. तसेच आरोग्य विभागाने पुरेशा डॉक्टरांची सेवा देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


      शहर बस आणि एस. टी. महामंडळाकडून उत्सव काळादरम्यान दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात पुरेशा प्रमाणात बसेस उपलब्ध करुन देण्याचे आणि वाहतूक शाखेच्या उपायुक्तांशी समन्वय ठेवून योग्य मार्गाने विनाअपघात व्यवस्था ठेवावी. तसेच औषधोपचार आणि तात्पुरते रुग्णालयांची व्यवस्था पुरेशा प्रमाणात करावी. पोलिस यंत्रणेने वाहतुकीचे मार्ग आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी. अन्नदान वाटपाच्या स्टॉल्सधारकांनी गर्दी होणार नाही हे लक्षात घेऊन स्टॉल्स उभारावेत. दीक्षाभूमी परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आगीसंबंधी अग्निशमन विभागाने पोर्टेबल फायर एक्सटिंगविशर सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.


            होर्डींग्ज व सूचनाफलक व्यवस्था, आकस्मिक पाऊस आल्यास अनुयायांसाठी पर्यायी आणि जवळच निवासव्यवस्था  ठेवावी. नियंत्रण कक्ष आणि पोलिस विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही यावेळी संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले. उत्सव काळादरम्यान पोलिस विभागाला मदत करण्यासाठी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले. याशिवाय ऐनवेळी आलेल्या सूचनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.


 


                                                                      

No comments:

Post a Comment

Pages