औरंगाबाद:
इतर धरणातून येणारी पाण्याची आवक कमी झाल्याने जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही आता कमी करण्यात आला आहे. त्यामुळे 1 लाख 13 हजार क्युसेकने होणारा पाण्याचा विसर्ग आता 80 हजारावर आला आहे. मात्र असे असताना नदी काठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे. सद्या धरणात 80 हजार 674 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणात सद्या 96.31 टक्के पाणीसाठा आहे.
तीन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे गोदावरीला नदीला पूर आले होते. तर जायकवाडी धरणातील पाण्याची आवक सुद्धा वाढली होती. पाण्याची आवक पाहता जायकवाडी धरणाचे सर्वच 27 दरवाजे 4 फुटांनी उघडण्यात आले होते. त्यामुळे धरणातून 1 लाख 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तर तो वाढवून दीड लाखापर्यंत जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबल्याने आवक सुद्धा कमी झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 80 हजार 674 क्युसेक जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग 80 हजार 672 क्युसेक
जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा: 2090.929 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 1521.33 (मीटरमध्ये)
जायकवाडी धरणाची पाणी पातळी 463.701 (फुटात) जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी: 96.31 टक्के
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरीही प्रशासनाने दिलेला सतर्कतेचा इशारा अजूनही कायम आहे. कारण अजूनही जायकवाडी धरणातून 80 हजार 672 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे पाण्याचा वेग अधिक असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदी पात्रात कुणीही उतरण्याचा प्रयत्न करू नयेत असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
No comments:
Post a Comment