नांदेड दि. 13 :- जागतिक स्तरावर प्रतिवर्ष 13 ऑक्टोबर हा दिवस जागतिक आपत्ती धोके न्युनिकरण दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारत व परिसरात विविध आपत्तींना वेळेवर प्रतिसाद देणे, समय सुचकतेनसार सज्ज राहणे या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक यांना विविध आपत्तीच्या वेळी उपयोगात येणाऱ्या महत्वपुर्ण साहीत्यांची ओळख आणि त्यांचा आणिबाणीच्या वेळी योग्य पध्दतीने वापर करण्याची रंगीत तालिम आज आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, श्रीमती संतोषी देवकुळे, श्रीमती दिपाली मोतियेळे, तहसीलदार विजय अवधाने, श्रीमती ज्योती चौहान नायब तहसीलदार मकरंद दिवाकर, जया अन्नमवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे, विधी अधिकारी अॅड. माळाकोळीकर यांची उपस्थिती होती.
यावेळी अग्निशमन अधिकारी शेख रईस पाशा हमिदोदीन यांनी विविध शोध व बचाव कार्य साहीत्य यांची उपस्थितांना ओळख करुन दिली. आग लागण्याचे मुख्य तीन कारण ज्वलनशिल पदार्थ, प्राणवायु आणि उष्णता हे आहेत. यातील एखादयाला ही जर आगीच्या ठिकाणातुन दुर केल्यास आग तात्काळ आटोक्यात येते हे त्यांनी प्रात्याक्षिक करुन दाखविले. एलपीजी गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरा- घरातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने घरातील गॅस सिलेंडरच्या लिकेजबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. वेळीच लक्ष न दिल्यास होणारा अपघात भीषण प्रकारे जीवावर बेतू शकतो. अचानक घरातील एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागल्यास त्या आगीला प्रभावीपणे कसे आटोक्यात आणावे याचे प्रात्यक्षिक शेख रईस पाशा यांनी उपस्थितांना करुन दाखविले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment