17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आकर्षक चित्ररथाला तरूणाईचा उत्तम प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 October 2022

17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या आकर्षक चित्ररथाला तरूणाईचा उत्तम प्रतिसाद

नवी मुंबई :                                        

11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत “17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022)” स्पर्धा भारतात संपन्न होत असून नवी मुंबई हे देखील या स्पर्धेचे यजमान शहर आहे. नवी मुंबईतील डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियम नेरुळ येथे या जागतिक स्पर्धेतील काही सामने खेळविले जात असून 30 ऑक्टोबर रोजी अंतिम सामना देखील डॉ.डि.वाय.पाटील स्टेडियममध्येच होणार आहे.


या निमित्ताने संपूर्ण जगभरातून फूटबॉलप्रेमी क्रीडा रसिक व स्पर्धेत सहभागी देशांच्या संघांतील महिला खेळाडू नवी मुंबईत आले असून त्यांच्या स्वागतासाठी नवी मुंबई सज्ज झालेली आहे. शहरातील विविध भागांमध्ये फुटबॉलच्या चित्रभिंतीं, मुख्य चौकातील फुटबॉलच्या शिल्पाकृती, हवेत सोडलेले फिफा स्पर्धेच्या प्रसिध्दीचा प्रसार करणारे एअर बलुन्स यांनी नवी मुंबई शहर सजलेले आहे. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालयांमध्ये जागतिक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉल खेळाविषयी व्यापक प्रचार - प्रसिध्दी केली जात आहे.


या प्रसिध्दीकरिता सध्याच्या ऑनलाईन युगात सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला जात असून याशिवाय भारताचा महिला फुटबॉल संघ या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून नवी मुंबईने विशेष जिंगल देखील मराठी व हिंदी भाषेत प्रदर्शित केलेली आहे.


या सोबत शहरभर फुटबॉल खेळाची व फिफा स्पर्धेची व्यापक प्रचार प्रसिध्दी व्हावी या दृष्टीने फुटबॉल प्रचार रथ निर्माण करण्यात आलेला आहे. नवी मुंबई परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीच्या सध्या वापरात नसलेल्या जुन्या बसचे चित्ररथात रुपांतर करण्यात आलेले असून यामध्ये महिला फुटबॉलचा प्रसार व त्यासोबतच महिला सक्षमीकरणाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आलेला आहे. या फुटबॉल चित्ररथात या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक, स्पर्धा आयोजनामध्ये यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांची चित्रमयी माहिती तसेच फिफा स्पर्धेत सहभागी संघांच्या कामगिरीची माहिती असणारे पॅनल्स आकर्षक स्वरुपात प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे व्हिडीओ जिंगलही प्रसारित करण्यात येत आहेत.


हा फुटबॉल चित्ररथ संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांमध्ये फिरत असून 30 ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणी जाऊन जागतिक स्तरावरील फुटबॉल स्पर्धा नवी मुंबईत होत असल्याची माहिती नागरिकांमध्ये प्रसारित करीत आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व एनएमएमटीचे व्यवस्थापक श्री.योगेश कडुसकर यांच्या संकल्पनेतून या फुटबॉल चित्ररथाची निर्मिती करण्यात आलेली आहे. अगस्ती एंटरप्रायझेस यांच्या कलादिग्दर्शनाखाली या चित्ररथाचे निर्माण करण्यात आलेले आहे. या चित्ररथाला नागरिकाचा विशेषत्वाने नवी मुंबईकर तरूणाईचा चांगल्या प्रमाणात उत्साही प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Pages