नियमांचे काटेकोर पालन हाच रस्ते अपघात कमी करण्यासाठी सशक्त पर्याय - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 18 October 2022

नियमांचे काटेकोर पालन हाच रस्ते अपघात कमी करण्यासाठी सशक्त पर्याय - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड  दि. 18 :- रस्ते खराब असल्यामुळेच अपघात होतात असे नाही. चांगले रस्ते असले तरी अपघातांची संख्या कमी होत नाही. वाहन चालवितांना असलेले नियम व मर्यादांचे उल्लंघन झाल्यानेच सर्वाधिक अपघात घडतात हे दुर्लक्षून चालत नाही. वाहतुकीला शिस्त यावी यासाठी शहरात जागोजागी आपण सिग्नल लावले आहेत. याबाबत असलेल्या नियमांच्या पालनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते अशी स्थिती आहे. स्वयंशिस्त आणि जबाबदार वाहतुक यातच आपल्याला अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात रस्ता सुरक्षा कक्षाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री. जमदाडे, मनपाचे अपर आयुक्त गिरीष कदम, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांची उपस्थिती होती.


रस्त्यावरील अपघातात निरक्षर माणसांच्या चुका कारणीभूत ठरत नाहीत. सुशिक्षित असलेले लोक ज्यांना नियमांची माहिती असते अशा लोकांकडून वाहन चालवितांना त्याचे उल्लंघन होते. सुशिक्षित लोकांसाठी रस्ता सुरक्षिततेबाबत कार्यक्रम घ्यावे लागणे हे जागृत समाजाच्या पराभवाचे लक्षण आपण समजले पाहिजे. कायदे व वाहन विषयक साक्षरतेसाठी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवायोजनाचे विद्यार्थी सदैव पुढाकार घेतील, असे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले.


 रस्ता सुरक्षा कामांमध्ये प्रत्येक विभागाची जबाबदारी वाढलेली आहे. थोडयाशा जबाबदारीने वाहन चालविल्यास अपघातामध्ये होणारे मृत्यु टाळता येतात. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.


अपघातात जीवीत हानीसह देशाचे होणारे आर्थिक नुकसान खूप मोठया प्रमाणात आहे. सन 2019 मध्ये सुमारे 4.50 लक्ष अपघात झालेले आहेत. प्रत्येक अपघातांमागे सुमारे 2 लक्ष रुपयांची हानी होते. हे गृहीत धरले तर सुमारे 14 हजार करोड रुपयाचे आर्थिक नुकसानाला आपल्याला सामोरे जावे लागते. अपघातांची भिषणता खूप असते. यात कुटूंबातील एखादया व्यक्तीचा जरी अपघात झाला तरी संपूर्ण कुटूंब उध्दस्त होते याकडे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी लक्ष वेधले.


 


या कार्यक्रमाचे मार्गदर्शक परिवहन उप आयुक्त (रस्ता सुरक्षा)भरत कळसकर यांनी मोहिमेचा उद्देश सांगितला. सर्व विभागांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हा उपक्रम हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे असे ते म्हणाले. परिवहन विभाग हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा महसूल विभाग आहे. अपघातांची संख्या कमी करणे हे महत्वाचे असून नांदेड जिल्हयातील अपघातांची माहिती घेतली असता सर्वाधिक अपघात हे वेगाची मर्यादा ओलांडून वाहन चालविण्यामुळे झालेले आहेत. या अपघातामध्ये 70 टक्के अपघात हे मोटार सायकल चालक असून त्यांची वयोमर्यादा हे 15 ते 45 दरम्यान आहे. या अपघात मधील व्यक्ती हया कुंटूबातील कर्ता व्यक्ती असून ती व्यक्ती गेल्यानंतर ते कुंटूब उघडयावर पडते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages