मुंबई, दि. 3 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जगातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रशासनाच्या वतीने या परिसरातील सर्व सोयी सुविधा काटेकोरपणे करा, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करावयाच्या सोयी - सुविधांबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री.लोढा बोलत होते. बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे मार्गदर्शक भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, चैत्य भूमीला जगभरातून तसेच देशातून लोक भेट देत असतात.या परिसरात सुविधा वाढवून या स्थळाला 'अ ' वर्ग दर्जाचे पर्यटन क्षेत्र बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. या परिसरातील मुंबई महापालिका प्रशासनाने स्वच्छते बाबतीत कार्यवाही करावी. चैत्य भूमी येथे यंदा मोठ्या प्रमाणात अनुयायी येतील त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवावी. अनुयायांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रेल्वे,मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य पूर्वतयारी करावी. रेल्वेने येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी केल्या.
प्रत्येक प्रशासकीय विभागांनी यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांबाबत माहिती दिली.
No comments:
Post a Comment