नांदेड दि. 3 :- समाजात विवेकाचे भान रुजण्यासाठी वाचन संस्कृती सारखा दुसरा भक्कम पर्याय नाही. अलीकडच्या काळात वाचनाचे असलेले प्रमाण लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांपासून प्रभावीपणे वाचनाची गोडी कशी रुजवता येईल याचा प्राधान्याने
विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड ग्रंथोत्सव समन्वय समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस माजी आमदार तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने, प्रकाशक संघटनेचे अध्यक्ष निर्मलकुमार सूर्यवंशी, साहित्य परिषदेचे प्रभाकर कानडखेडकर, प्रा. केशव देशमुख, नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष लक्ष्मण संगेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीसाठी वर्षभर विविध चांगल्या उपक्रमाचे नियोजन शक्य आहे. वाचन प्रेरणा दिन ही एका दिवसाची प्रक्रिया नसून संबंध वर्षेभरात प्रत्येक महिन्यात त्या-त्या संस्थाच्या माध्यमातून उपक्रम हाती घेणे सहज शक्य आहे. आपण लोकांपर्यंत कसे पोहचू याचे नियोजन महत्वाचे असून या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रमांची आपल्याला निश्चिती करता येऊ शकेल, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
शाळा, महाविद्यालयातील युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी अभिवाचन सारखे प्रयोग त्यांच्या पुढे सातत्याने झाले पाहिजेत. यासाठी या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून काही नियोजन करता येते का याचा विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी वाचनाचे संस्कार रुजविण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शैक्षणिक संस्थेमार्फत वेगळे नियोजन करू, असे सांगितले. यावेळी प्रा. केशव देशमुख, निर्मल कुमार सुर्यवंशी यांनी हा महोत्सव अधिक लोकाभिमूख कसा होईल याबाबत सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment