किनवट तालुक्यात थंडीची चाहूल किनवट व परिसरातील नीचांकी तापमानाची नोंद 16 अंश सेल्सिअस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 3 November 2022

किनवट तालुक्यात थंडीची चाहूल किनवट व परिसरातील नीचांकी तापमानाची नोंद 16 अंश सेल्सिअस

किनवट, दि.03(प्रतिनिधी) : किनवट तालुक्यात कमाल व किमान तापमानात चढउतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून किमाप तापमानात घट झाल्यामुळे पहाटेचा गारठा वाढला असून, दुपारी  उन्हाचा चटका जाणवत आहे. सोमवारी (दि.31) सकाळपर्यंच्या 24 तासांमध्ये किनवट व परिसरातील नीचांकी तापमानाची नोंद 16 अंश सेल्सिअस झालेली आहे.  


        नैऋत्य मौसमी वार्‍यांनी महाराष्ट्रासह देशाचाही निरोप घेतल्यामुळे आकाश पूर्णत: निरभ्र झालेले आहे. उत्तरेकडून वाहणार्‍या  थंड व कोरड्या वार्‍यामुळे संपूर्ण राज्यातील किमान तापमानात घट झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.  दिवाळीमध्येच शहरातील पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. थंडीची चाहूल लागल्यामुळे शहरात गरम कपडे विकणार्‍या विक्रेत्यांचेही आगमन झालेले आहे.  सकाळच्या सुमाराला काही भागांमध्ये धुकेही दाटत आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्याची उपासना करणार्‍या नागरिकांमध्येही उत्साह संचरल्यामुळे, भल्या पहाटे ‘मार्निंग वॉक’ करणार्‍यांची संख्या वाढत आहे. तरुण मंडळी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामावर भर देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाळ्यात शहरातील अंडी विक्रीत घट झाली होती. ती आता वाढली असून, अंड्याच्या किमतीतही थोडीफार वाढ झाल्याचे घाऊक विक्रेत्याने सांगितले.


     सध्याचे हवामान ऊस, द्राक्ष, हळद, आले, डाळिंब, केळी या फळ पिकांबरोबरच भाजीपाला पिकांनाही अनुकूल ठरत आहे. या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहील. पालेभाज्या, फळभाज्या पिकांवर रोग आणि किडींचा उपद्रव कमी प्रमाणात जाणवेल. हवामान अनुकूल असल्याने पालेभाज्यांची वाढ आणि प्रत चांगली राहील. रोगांच्या वाढीसही हवामान प्रतिकूल राहील. या आठवड्यातील स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अधिक कालावधी आणि थंडीचे योग्य प्रमाण  रब्बींच्या गहू,हरभरा व ज्वारी या पिकांसाठी लाभदायी ठरेल त्यामुळे सद्यःस्थितीतील हवामान घटकानुसार शेती नियोजन करणे आवश्यक आहे, असे तालुका कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Pages