महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारी चा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतला आढावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 1 November 2022

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारी चा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतला आढावा

मुंबई दि.1 -   महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक  चैत्यभूमी येथील स्तूप अनेक वर्षांपासून उभा असून तो जीर्ण झाला आहे. त्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी सुरक्षित राहाव्यात यासाठी या स्तूपाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दीक्षाभूमी प्रमाणे भव्य स्तूप उभारावा;त्यासाठी आंबेडकर कुटुंबीयांशी महापालिकेने चर्चा करावी. चैत्यभूमीजवळचा रस्ता अधिक 15 फूट वाढविण्यासाठी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आपण सीआरझेड च्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू असे आश्वासन आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापारिनिर्वाण दिना निमित्ताने चैत्यभूमी दादर मुंबई येथे शासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सेवा सुविधा व नियोजन या बाबत आढावा बैठक आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आली होती.


या बैठकीचे नियोजन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वतीने व त्यांच्याच अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.


या बैठकीस मुंबई शहाराचे पालक मंत्री दीपक केसरकर; स्थानिक खासदार राहुल शेवाळे; सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे;  स्थानिक आमदार सदा सरवणकर  माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर;  डिजीपी   ; वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील; समाज कल्याण आयुक्त प्रवीण नितनवरे; उपयुक्त प्रणय अशोक;  जिल्हाधिकारी निधी  चौधरी;  रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; महापरिनिर्वाण दिन समन्वय समीतिचे नागसेन कांबळे; भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो  आदी अनेक  मान्यवर  शासनाचे सचिव अधिकारी, पोलीस सह आयुक्त, कलेक्टर, इत्यादी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


कोविड निर्बंध उठल्या नंतर यंदा महापरिनिर्वाण दिन असल्याने जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. रेल्वे विभागाने  काही बजेट खर्च करून जास्त खबरदारी व सुविधा द्याव्यात अशी सूचना ना.रामदास आठवलेंनी केली. महापालिकेच्या वतीने बाहेरून येणाऱ्या अनुयायांची जेवणाची व्यवस्था करावी अशी महापालिकेस सूचना ही त्यांनी केली.


या प्रसंगी समाज सेवक तथा महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी नियोजनच्या सविस्तर सूचना  व मागण्या उपस्थितां समोर ठेवल्या.यावेळी अमित तांबे; सुमित वजाळे; हेमंत रणपिसे ; चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages