खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी आली 46.77 पैसे पैसेवारी 50 पैशाच्या आत आल्यामुळे शेतकर्‍यांना शासकीय मदतीची आशा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 November 2022

खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी आली 46.77 पैसे पैसेवारी 50 पैशाच्या आत आल्यामुळे शेतकर्‍यांना शासकीय मदतीची आशा

किनवट, दि.02:  सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज 52.67 पैसेवारी जाहीर केल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे सुधारित पैसेवारीकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी ही केवळ अंदाजित असून, सुधारितमध्ये बदल होण्यास वाव असल्याचे सूचक विधान केले होते. ते तंतोतंत खरे ठरून अखेर सुधारित पैसेवारी 50 पेक्षा कमी अर्थात 46.77 पैसे निघाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असून, अनेक बाधित शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.


       महसूल विभागाच्या नोंदीनुसार किनवट तालुक्यातील खरीप हंगामाचे लागवडीखालील सर्वसाधारण क्षेत्र 80 हजार 986 हेक्टर असून, प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी झालेले क्षेत्र 77 हजार 904 हेक्टर आहे. कृषी विभागाच्या खरीप पेरणी अंतीम अहवालानुसार यंदा नगदी पिकांमध्ये 42 हजार 340 हेक्टरवर कापसाची तर 25 हजार 063 हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. पावसाळ्यात तालुक्यातील विविध मंडळात तब्बल दहा वेळा झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांच्या  उपरोक्त क्षेत्रातील कापूस व सोयाबीनचे  33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. जुलैमधील अतिवृष्टीमध्ये तब्बल 53 हजार 451 शेतकर्‍यांचे 49 हजार 332 हेक्टरवरील कापूस,सोयाबीन, तूर व इतर पिके अतिवृष्टीमुळे बाधित झालेली होती. पुढेही सततचा पाऊस व अतिवृष्टीचा फटका शेतकर्‍यांना बसल्यामुळे आणि परिणामी सवंगणी व मळणीचा खर्चही भरून निघणार नसल्याने, बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या क्षेत्रावर रोटावेटर फिरविले. तसेच संततधार पावसामुळे कापसाची बोंडे काळी पडून सडल्या गेली. सध्या उर्वरीत कापसावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, शेतकरी तेही उपटून काढत आहेत.


    खरीप हंगामाच्या उत्पादनाचे प्राथमिक चित्र स्पष्ट करणारी किनवट तालुक्यातील 176 गावांमधील नजरअंदाज पैसेवारी 30 सप्टेंबर रोजी  52.67 पैसे दाखविण्यात आली होती.  50 पैशाच्या आत जर पैसेेवारी आली तरच परिस्थितीनुसार ओला किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करून शासन मदत करीत असते. त्यात बाधित शेतकर्‍यांना काही प्रमाणात सवलती मिळतात. यात जमीन महसुलात सूट, शेतकर्‍यांच्या कर्जाची सक्तीने वसुली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे.  नजरअंदाजपैसेवारीत तालुक्यातील शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र, महिनाभरानंतर तालुक्यातील नऊ मंडळातील निवडक सज्जांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात  हलक्या,मध्यम व भारी जमीनीच्या शेतात प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग करून ही सुधारीत पैसेवारी गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने काढली आहे.


        या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर  रोजी जाहीर झालेल्या सुधारीत पैसेवारीमध्ये तालुक्यातील नऊ महसूल मंडळातील पैसेवारी ही 50 पैशापेक्षा कमी अर्थात 46.77 आल्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. 31 डिसेंबरला अंतीम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच खरीपाच्या तालुक्यातील एकंदर स्थितीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी या सुधारीत पैसेवारीत ओल्या दुष्काळाचे किंचीत दर्शन झाले असल्यामुळे, शेतकर्‍यांमध्ये शासकीय मदतीची आशा निर्माण झालेली आहे.

No comments:

Post a Comment

Pages