किनवट (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनामुळे महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा सुरू केली आहे. 2022-23 या वर्षात किनवट तालुक्यातील इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.
या योजनेकरिता किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र अनुज्ञेय आहे. कमाल क्षेत्र मर्यादित लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपीक लागवड करता येईल. या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर व चिकू यांचा समावेश करण्यात आला आहे.
मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक लाभ घेता येईल. शेतकर्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकर्यांनी ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाअंतर्गत नोंदणी करावी. या योजनेतंर्गत अनुदान मंजूर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे अर्ज करताना शेतकर्यांनी सातबारा व आठ अ नुसार क्षेत्र सर्व्हे नंबर फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे परिणाम (मीटरमध्ये) इत्यादी माहिती शेतकर्यांनी अचूक भरावी. महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून योजनेंतर्गत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक लक्ष्यांकाच्या अधीन राहून संगणकीय सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासंबंधी माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.
“भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजने अंतर्गत किनवट तालुक्यात 2018-19 साली सिरमेटी, बेंदी येथील दोन लाभार्थी शेतकर्यांनी तीन हेक्टरवर आंबा या फळासाठी तर कनकवाडी, मांडवा व दाभाडी येथील चार शेतकर्यांनी पाच हेक्टरवर सिताफळ साठी या योजनेचा लाभ मिळविला आहे. यंदाच्या 2022-23 या वर्षासाठी सध्यापर्यंत 123 शेतकर्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.”
No comments:
Post a Comment