कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही - आरोग्यमंत्री सावंत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 December 2022

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही - आरोग्यमंत्री सावंत आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

नागपूर : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नसून  प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तत्काळ  विलगीकरण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. Tanaji Sawant - तानाजी सावंत यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


चीनसह अन्य काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून प्रतिबंधात्मक उपायांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुन्हा एकदा कोरोना  चाचणी,  उपचार,  लसीकरण आणि कोरोना रुग्णांची  तपासणी सुरू करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. Tanaji Sawant - तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


राज्यात अद्याप BF.7 या नवीन प्रकाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु शेजारच्या राज्यात चार आढळले आहेत, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विमानतळ, राज्याच्या सीमारेषा या भागातून येणाऱ्या व्यक्तींची  थर्मल चाचणी आणि इतर आवश्यक चाचण्या केल्या जातील. याबरोबरच त्या चाचणीत काही आढळून आले तर लगेचच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. 


कोरोनाचे  निर्बंध अद्याप कुठेही लावण्यात येणार नसून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. त्याचबरोबर, राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला असून यंत्रणेस अलर्ट मोडवर राहण्याच्या सुचना दिल्या असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले असून नवीन व्हेरिएंट हा तेवढा घातक नसल्याचा दिलासाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.


पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी डॉ. आरोग्यमंत्री सावंत, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, डॉ. साधना तायडे यांच्यासह राज्यातील सर्व उपआरोग्य संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडिओद्वारे संवाद साधला आणि त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. 



No comments:

Post a Comment

Pages