भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कोसळले ; भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 12 January 2023

भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव कोसळले ; भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात

 किनवट. दि.12(प्रतिनिधी) :  ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर किनवट तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिके घेतली. त्यामुळे सध्या शहरातील भाजीमंडईत भाजीपाल्याची आवक कमालीची वाढली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव प्रचंड कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून,  शेतीतून तोडणी करणे आणि बाजारात विक्रीसाठी आणण्याचा खर्च देखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होत आहे.


        भाजीपाल्याचे भाव गडगडल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असले, तरी कमी का होईना पैसे मिळत असल्याने व्यापारी खुश आणि कमी भावामुळे ग्राहक आनंदी आहेत. जनावरांच्या चार्‍यापेक्षाही भाजीपाला स्वस्त असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढल्याने दराचे गणित बदलले आहे. दोन आठवड्यांपूर्वी 20 रुपयाला मिळणारी मेथीची जुडी आता दहा रुपयांत दोन मिळत आहेत. पालकाची जुडीदेखील पाच रुपयांत मिळत आहे.


       नगदी पीक म्हणून हिवाळ्यात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. खरीप हंगामातील मूग,उडीद,ज्वारी,सोयाबीन, मका या पिकांच्या काढणी नंतर शेतात कमी कालावधीत पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी भाजीपाल्याकडे वळतो. मात्र वाढता खर्च आणि वाढती मजुरी यामुळे भाजीपाला पीक हातात येईपर्यंत लागवडीचा खर्च भरमसाट होतो. अलीकडील काळात तर शेतकर्‍यांना कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. खराब हवामान, वाढती थंडी, बेमोसमी पाऊस यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होत असते.


       यंदा भाजीपाला व फळभाज्यांसाठी मुबलक पाणीसाठा व पोषक वातावरण असल्याने, किनवट तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात तब्बल 903 हेक्टरवर पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, पालेभाज्यांसह फळभाज्यांचे भाव खालावू लागले आहेत. फूलकोबी व पानकोबींचे दर पडल्याने शेतकर्‍यांना वजनाऐवजी दहा रुपयाला 2 किलोचा मोठा गड्डा इतक्या कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. राजगिरा,चाकवत, तांदुळजा,करडई, कोथिंबीर,माठ या पालेभाज्यांच्या जुड्यांची किंमत केवळ पाच रुपये आहे. टोमॅटो 10 रु., वाटाण्याच्या शेंगा 30 रु.तर मिरची 50 रु.प्रति किलोचा दर परवा रविवारच्या आठवडी बाजारात होता. वांगी,कारली,भेंडी 20 रु. गवार,चवळी,वालाच्या शेंगा,गाजर,आलू फक्त 30 रू किलोने विकले जात आहेत. शेवग्याचे दरही मागील आठड्यापासून उतरले असून, शेवगा 30 ते 40 रुपये किलोने विक्री होत आहे. हे सर्व सकाळपासून दुपारपर्यंतचे भाव आहेत. सूर्य मावळतीकडे झुकू लागला की, भाजीपाल्याचे भाव अजून उतरू लागतात. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी, बाया-बापडी घरी जायच्या घाईने उरलासुरल्या भाजीपाल्याचे ढीग लावून येईल त्या भावाने विक्री करतात आणि उरलेच तर गुरा-ढोरांपुढे टाकून आपल्या गावची वाट धरतात.


     स्वस्तात भाजीपाला मिळत असल्याचा काहीसा फटका व्यापार्‍यांनाही बसत आहे. मात्र, काही व्यापारी चढ्या भावाने भाजीपाल्याची विक्री करून यातही पैसे कमावताना दिसतात. त्यामुळे भाजीपाला स्वस्त असला, तरी अशा व्यापार्‍यांचा व्यवसाय जोरात आहे.


“यंदा पाणी मुबलक असल्याने पालक,मेथी, शेपूसह वांगी,टोमॅटो,कारली,दोडकी या भाजीपाला व फळभाज्यांची  लागवड केली होती. मात्र, दोन आठवड्यापासून भावच नसल्याने उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.”


-राजू पाटील सुरोशे. घोटी.ता.किनवट

No comments:

Post a Comment

Pages