दिन विशेष : "जयभीम" चे जनक हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास एल. एन. यांची जयंती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 5 January 2023

दिन विशेष : "जयभीम" चे जनक हरदास लक्ष्मणराव नगराळे उर्फ बाबू हरदास एल. एन. यांची जयंती

हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू एल. एन. हरदास (१९०४-१९३९) हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक दलित पुढारी व समाजसुधारक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रखर अनुयायी असलेल्या बाबू हरदास यांना "जय भीम" या शब्दाचा अभिवादानासाठी उपयोग करण्याच्या प्रथेचे जनक मानले जाते. ते कामगारांचे नेते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे मध्य प्रांताचे सामान्य सचिव होते.


बाबू हरदास यांचा जन्म कामठी येथे ६, जानेवारी १९०४ रोजी एका महार कुटुंबात झाला.त्यांचे वडील लक्ष्मणराव नगरकर हे रेल्वे खात्यात कारकून होते. बाबू हरदास यांचे मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील पटवर्धन विद्यालयात झाले. त्यांनी नागपूर येथे आर्य समाजाच्या स्वामी ब्रह्मानंद यांच्याकडून संस्कृतचाही अभ्यास केला.


त्या काळच्या प्रथांनुसार, वयाच्या सोळाव्या वर्षी १९२० मध्ये बाबू हरदास यांचा विवाह साहूबाई यांच्याबरोबर झाला. बाबू हरदासांचे आयुष्य त्यांच्या समाजबांधवांमध्ये जागृती करण्याच्या कार्यामुळे बरेच धावपळीत गेले. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना क्षयरोगाने बाधले व त्यातच जानेवारी १२, १९३९ त्यांचा मृत्यू झाला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरात साजरी होणारी जयंती असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाणदिन असो, नाही तर नागपुरातील दीक्षाभूमीवरील धम्म सोहळा असो या सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे `जय भीम'. 


हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्या नंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी यासाठी 'जय भीम' हा शब्द मोठ्या आदरभावाने संबोधला जातो.

आंबेडकरी समाजातील राजकारणात अनेक गट-तट असो किंवा आंबेडकरी समाजातील नेते इतर पक्षात स्थिरावलेले असो त्यांच्या मुखातून वेळोवेळी आपसूकपणे 'जय भीम' हे शब्द बाहेर पडतात. मात्र, कोणत्याही आंबेडकरी नेत्यांना 'जय भीम' चे जनक बाबू हरदास यांची जयंती साजरी करावी असे वाटले नाही किंबहूना समाजही त्यांच्या बाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले असल्याचे दिसत आले आहे.


अवघ्या 17 व्या वर्षी `महारठ्ठा ' नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. 1927 त्यांनी दलित समाजातील मुला-मुलीसाठी कामठी येथे रात्र शाळाही चालवली. त्यात 86 मुले आणि 22 मुली शिकून बाहेर पडल्या. संत चोखामेळा यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.


1928 साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. देशात दलितांचा नेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळी बाबू हरदास यांनी 1930-31 साली दुसरी गोलमेज परिषद भरली त्या सुमारास रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना यासंबंधी "तार" करून स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, देशात एकमेव दलित नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. त्यांनी यासंबंधी मॅकडोनाल्ड यांना जवळपास 32 तारा त्यांच्या माध्यमातुन पाठविल्याची नोंद आहे


'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन' च्या पदावर संयुक्त सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1924 साली त्यांनी 'मंडइ महात्मे' हा ग्रंथ लिहिला. 'वीर बालक' नावाचे नाटकही त्यांनी लिहिले. बाबासाहेबांच्या 'जनता' वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सचिव पदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


1937 साली नागपूर-कामठी या विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे दलित चळवळीत खूप मोठे योगदान असून त्यांनी दिलेला 'जय भीम' शब्द हा अजरामर असाच आहे. म्हणूनच आज ते 'जय भीम'चे जनक म्हणून ओळखले जातात.


"1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मक्रणपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना 'जय भीम'च म्हणत जाऊ."

"बाबू हरदास यांनी हा नारा दिला तर भाऊसाहेब मोरेंनी या नाऱ्याला समर्थन दिले,"



बाबू हरदास यांचे 12 जानेवारी 1939 साली अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. दलित समाजात राहून चळवळीला योगदान देणारे बाबू हरदास हे आज दुर्लक्षितच राहिले आहेत. आंबेडकरी समाजाला स्वतंत्र बाण्याचा 'जय भीम' सारखा शब्द देऊनही त्यांची फारशी कुणी दखल घेतल्याचे जाणवत नाही. त्यांची जयंती साजरी झाल्याचेही दृष्टीक्षेपात दिसत नाही.

आज आंबेडकरी समाजाची मते मिळविण्यासाठी गल्ली-बोळात, वाडय़ा-तांडय़ावर, शहरा-शहरात दलित नेत्यांसह इतर नेतेही 'जय भीम'चा जयघोष करताना दिसतील.


अतिशय कमी वेळात चळवळीसाठी प्रचंड मोठे कार्य करणाऱ्या जय भीम प्रवर्तक बाबू हरदास यांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन !

No comments:

Post a Comment

Pages