औरंगाबाद :
आवारातील प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास त्यास दोन हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या आवारात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास त्यांना तीन हजार रूपये दंड आकारला जाणार असल्याचा निर्णय विद्यापीठाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सोबतच वाहनाच्या वेगावर बंधने घालण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षितता आणि गैरप्रकार टाळण्यासाठी अशाप्रकारे निर्णय घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठ परिसरात एका चारचाकी अपघात झाला होता. तसेच अनेकदा मुलं व्हिडिओ बनवण्यासाठी याठिकाणी स्टंटबाजी करतांना देखील आढळून येतात. त्यामुळे मागील काही घटना लक्षात घेता डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यापीठातील सुरक्षितता आणि गैरप्रकार टाळण्यासाठी सुरक्षेसंदर्भात 18 निर्णय घेण्यात आले. ज्यात यापुढे विनापरवाना कोणालाही विद्यापीठ परिसरात शूटिंग करता येणार नसल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर निदर्शने, तसेच आंदोलने होतात. मात्र आता प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनाला पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. याशिवाय उपोषण, मोर्चे, आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहणार आहे. कुलगुरूंच्या कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही. आंदोलनांच्या परवानगीसाठी कुलसचिवांच्या अध्यक्षतेखाली चारसदस्सीय समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे आता आंदोलनासाठी देखील परवानगी घ्यावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment