किनवट तालुक्यातील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 2 January 2023

किनवट तालुक्यातील तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

किनवट. (प्रतिनिधी) : सध्या ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील तूर पिकावर मोठ्या प्रमाणात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. कापूस व सोयाबीनचा पुरता फज्जा उडाल्यानंतर तुरीवरही या अळीच्या आक्रमणामुळे शेतकर्‍यांची चिंतेत भर पडली असून, त्वरित उपाययोजना न केल्यास उतार्‍यात घट येणाची शक्यता आहे.


  किनवट तालुक्यात कापूस व सोयाबीननंतर महत्वाचं नगदी खरीप पीक म्हणजे तूर असून, तब्बल 6 हजार 133 हेक्टर क्षेत्रावर याची पेरणी झालेली आहे. अतिपावसात कापूस व सोयाबीन हातचे गेले तरी उत्तम वाढ होऊन बहरलेल्या तुरीतून आपल्याला हमखास उत्पादन हाती लागणार असल्याची शेतकर्‍यांना अपेक्षा होती. मात्र, सध्या तालुक्यात सर्वत्र अनेक हेक्टर क्षेत्रावर या शेंगा पोखरणार्‍या अळीच्या प्रादुर्भावामुळे धास्तावल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका सर्वेक्षणानुसार शेंगा पोखरणाऱ्या या किडीचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना बसण्याची शक्यता आहे.


   तुरीचं पिक शेंगावर आल्यानंतर तीन किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिकावर होत असतो. यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग आणि शेंग माशी या तीन किडींचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी दिली असून,  एका झाडावर जर दोन ते तीन अळ्या आढळल्या तर लगेच फवारणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


     तालुका कृषी कार्यालयाने केलेल्या शिफारसीनुसार :  पहिल्या फवारणीत सर्वात आधी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा 300 पीपीएम अझॅडॅरेक्टीन 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. जास्त प्रादुर्भाव असेल तर 1500 पीपीएम अझॅडॅरेक्टीन 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.  प्रादुर्भाव दोन ते तीन अळ्या प्रती झाड आढळल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारावे.  पुढील 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी. त्यावेळी इमामेक्टीन बेनझॉईट 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. तसेच क्लोरेनट्रेनीफॉल 18.5 टक्के 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.


    “शेतकर्‍यांनी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्याबरोबर प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून शिफारसीनुसार पहिली फवारणी करावी. प्रादुर्भाव दोन ते तीन अळ्या प्रति झाड आढळल्यास त्यापुढे दिलेल्या शिफारसी अवलंबाव्यात. उतार घटण्याच्या शक्यतेपूर्वीच उपाययोजना केल्यास या शेंगा पोखरण्याऱ्या अळीस अटकाव होतो. गरज पडल्यास नजीकच्या कृषी सहायकास अथवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.”


- बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages