किनवट,दि.१५ : लोणी(ता.किनवट) येथिल कालवा निरीक्षक हे नांदेडला राहून कर्तव्य बजावत असल्याने त्यांची बदली करून नवा निरीक्षक देण्याची मागणी शेतकऱ्यांनी सर्व संबंधितांना निवेदन देऊन नुकतीच केली आहे
लोणी मध्यम तलावातील पाणी कॅनॉलद्वारे गेल्या आठवडा भरापासून सोडण्यात येत नसल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका व ज्वारी ही पिके करपण्याच्या मार्गावर आहे, तर उन्हाळी हंगामाच्या नियोजनावरही पाटबंधारे (व्य) विभागाचा आसर पडणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
लोणी मध्यम प्रकल्पाचे घोटी ते कॅनॉल टेलद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी सोडले जाते. मात्र,मागील काही दिवसांपासून हे पाणी सोडण्यात आले नसल्याने रब्बी हंगामातील पिके करपण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आता तीळ आणि ज्वारी पीक हे पीक घेण्यासाठी रान तयार केले आहे.
पण लोणी तलावाचे पाणीच गेल्या आठ दिवसांपासून सोडण्यात आले नसल्याने तीळ व अन्य पिकांच्या पेरणीचे नियोजन बिघडले आहे. त्याचा परिणाम पेरण्यांवर होणार आहे. या विषयी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी व नांदेडचे कार्यकारी अभियंता यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. बहुतांश अधिकारी व कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कर्तव्य बजावत असल्याने प्रकल्पाच्या खालील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना क्वचितच ते भेटतात, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.निवेदनावर गौतम पाटील, किसन मुनेश्वर, व्यंकट दुग्गलवार, काझी करिमोद्दीन, काजी गब्बर व बंडू कांबळे या लाभधारक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कृषी आणि शेतकऱ्यांचे काम पडणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment