औरंगाबाद :
जी- २० परिषदेनिमित्त महापालिका आणि स्मार्ट सिटी च्या सहकार्याने ४५६ फुट लांब आणि ७ फुट उंच भिंतीवर वारली पेंटिंगचा जागतिक विक्रम नोंदविण्यात शहरातील तरुणाईला शुक्रवारी यश आले. शहरातील १२० तरुणींनी पालघर येथून आलेल्या वारली पेंटिंग कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी जमातींच्या संपूर्ण जीवनशैली वारली पेंटिंगच्या माध्यमातून भिंतीवर उतरविल्याने शहरवासियांची मने जिंकली.
जी-२० परिषदेला अवघे दहा दिवस उरले आहे. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातून सुमारे अडिचशे महिला प्रतिनिधी औरंगाबादेत येणार आहेत. या परिषदेच्या तयारीसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त केले जात आहे. शिवाय संपूर्ण शहरात रंगरंगोटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यातच शहरातील सुमारे १२० महिला कलावंतांनी हातात रंग आणि ब्रश घेऊन शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक ते महावीर चौक रस्त्यावरील एसटी वर्कशॉपच्या सुमारे ३हजार २०० चौरस फुट आकाराच्या भिंतीवर सहा तासांत आकर्षक वारली पेंटींग काढण्याचा विश्व विक्रम केला. अशा प्रकारे शहरात एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने केवळ महिला कलावंतानी एकत्र येऊन वारली पेंटींग काढण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी १० वाजता महापालिकेचे उपायुक्त सोमनाथ जाधव, स्मार्ट सिटीचे डेप्युटी सीईओ सौरभ जोशी,राहुल सूर्यवंशी, अप्पर आयुक्त बी.बी.नेमाणे यांच्या उपस्थितीत झाला. या उपक्रमासाठी शहरातील आर्टिस्ट राजनंदीनी घोडेले यांनी पुढाकार घेतला. ४५६ फुट लांब आणि ७ फुट उंच भिंतीवर काढण्यात आलेल्या आकर्षक गेरू आणि पांढऱ्या रंगात काढलेल्या वारली पेटींगच्या माध्यमातून पालघर, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची संस्कृती आणि जीवनशैली उतरविण्यात आली.
No comments:
Post a Comment