चढे पारा जुल्माचा लढाया बळ द्या मज आता...! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 February 2023

चढे पारा जुल्माचा लढाया बळ द्या मज आता...!


                  


    शिवरायांच्या कालखंडास 350 वर्षे लोटल्यानंतरही स्वराज्याविषयीचे आपले आकर्षण तसूभरही कमी झालेले  नाही. रयतेच्या राजाच्या कार्यपद्धतीला आणि त्यांच्या युद्धनितीला, गुलामी नष्ट करण्याच्या इतिहासाला नवनवीन पध्दतीनं समजून घेण्याचे प्रयत्न होतात. स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांच्या अनेक कथा इतिहासाचे अभ्यासक आज संशोधन करून जगासमोर आणत आहेत. तेंव्हा मावळ्यांच्या त्यागाने आणि शिवरायांच्या धोरणांने उभारलेले स्वराज्य डोळ्यासमोर येतं आणि खरोखरच तेव्हा प्रत्येकाला आपण मराठी असल्याचा एक अभिमान वाटतो. हळव्या मनात एक प्रकारची ऊर्जा संचारते. या महान स्वराज्याचे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक लोकराजा छत्रपती शिवाजी राजा यांच्या कार्यास आपण मनोमन नतमस्तक होतो.

  स्वराज्यातील रयतेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले कायदे आणि न्यायप्रिय धोरण आणि त्यांच्याच रयतेचे राज्य या  विचारावर उभारलेल्या भारतीय लोकशाहीची आज होत असलेली विटंबना पाहून अतीव दुःख होते.  देशात आज घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  छत्रपती शिवाजी महाराजांची  जयंती साजरी करत असताना  नक्कीच अनेक प्रश्न पडतात...

शिवाजी राजांनी स्वराज्यात कधीही जातीधर्मावर आधारित भेद केला नाही. त्यांचा मावळा हा काही विशिष्ट अशा एका जातीचा नव्हता तर तो अठरापगड जातीतील होता. मावळा हा स्वराज्याचा शिलेदार होता, तशाच धरतीवर आपल्या देशाची उभारणी करणे गरजेचे आहे. जातीविहीन समाजाची उभारणी तथा निर्माण केल्याखेरीज  स्वराज्याची कल्पना करणे केवळ अशक्य आहे.   

शिवरायांनी समतेचा वारसा दिला पण आज देशात जातीयवाद आणि धर्मांधता फोफावत आहे. त्यातून देश एका वेगळ्या  वळणावर जात असल्याचे दिसून येत आहे. ही बाब मनाला वेदना देणारी आहे. कोण कोणत्या जातीचा आहे, हे त्याच्या पेहरावावरून ओळखा असा फतवा निघत आहे.त्यांच्या घरावर बुलडोसर चालवा. मुस्लिम बांधवाना आजही देशभक्ती सिद्ध करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी राजांचे स्वराज्य आपण केवळ पुस्तकाच्या पानात कैद तर करत नाहीत ना? असा प्रश्न पडतो.


छत्रपतींच्या स्वराज्यात महिलेला किती सन्मान होता, स्वराज्यातील लेकीबाळींच्या अब्रूवर कुणी हात घालायचा प्रयत्न केला तर त्याची काही खैर नसायची. रांझा गावच्या पाटलाने जेव्हा एका महिलेवर बलात्कार करून तिला मारून टाकलं होतं तेव्हा त्या पाटलाचे दोन्ही हात तोडून टाकण्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली होती. अत्याचार करणाऱ्याला कुठलीही जात नसते हे त्यांनी या निवाड्यातून  दाखवून दिलं होतं.

परत कुणी स्वराज्यातल्या महिलांकडे वाईट नजरेने बघू नये  म्हणून राजांनी अशी कठोर शिक्षा दिली होती. इथं राजांनी अत्याचार करणारा हा पाटील आहे म्हणून त्याला माफ केले नाही.

मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो, ‘‘जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा आईशी वागतो, तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे.’’ शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ, धार्मिक स्थळे, स्त्रियांचा सन्मान केला. आपल्या शत्रू पक्षाच्या महिलांचाही सन्मान करावा, ही उच्च कोटीची नैतिकता त्यांनी मावळ्यांच्या मनात रूजविली. 

शिवाजीराजांच्या ठायी अशी नैतिकता होती. त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यांतील महिलांचे संरक्षण केले. महिलांवर अन्याय करणाऱ्या बाबाजी गुजर यालाही त्यांनी कठोर शिक्षा केली .

पण आज जेव्हा विचार करतोय तर चित्र हे खूप बदलून गेल्या सारखे वाटतेय. देशात आज महिला सुरक्षित आहेत का ? 

कुठं असिफा एक छोटीशी चिमुरडी, कुठं उन्नाव, कुठं जय श्रीराम म्हण म्हणून मारलेला मुस्लिम बांधव, कुठं रोहित, जुनेद, नजीब, जामिया इस्लामीया विद्यापीठातील घटना असेल किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मधील विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला असेल यामुळे देशात विषमतेचे, जातीयतेचे आणि धर्मांधतेचे वारे वाहत आहे. कोण कुठल्या जातीचा आहे हे पाहून अत्याचार करण्याच्या घटना  दिवसेंदिवस वाढत आहेत.  वाईट बाब म्हणजे अत्याचार करणारांचे  सत्कार सोहळे होताहेत. शिवराय असते तर त्यांना हे आवडले असते का?

वतनदार  शेतकर्यांचे शोषण  करायचे. जहागीरदारी, वतनदारी शिवरायांनी बंद केल्या. 

 शेतकऱ्यांना सुरक्षितता प्रदान केली.  शेतकऱ्याच्या  शेतातील कणसाला किंवा काडीला सुद्धा परस्पर हात न लावण्याचे धोरण आखले आणि एक शिस्त निर्माण केली. दुष्काळी परिस्थितीत शेतसारा माफ केला...

 पोरीच्या लग्नाचा विचार करणारा , मुलाला चांगलं शिक्षण देण्यासाठी राबराब राबणारा  शेतकरी उपाशी आहे.त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत  नाही. शेतात कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांस हक्क मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून मोर्च्यांत सामील व्हावं लागत आहे.

आणि हे सगळं करून झाल्यावर न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेला शेतकरी गळफास लावून ह्या निर्दयी जगाचा निरोप घेतोय.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटलांनी न्याय हक्कासाठी स्वतःचा प्राण दिला. धर्मा पाटीलांनी  मंत्रालयाच्या दारात आपले जीवन संपवले. कुटुंबाला न्याय देणे तर दूरच पण सत्तेचे दलाल जेव्हा प्रचार सभा घ्यायला धुळे जिल्यात जातात तेव्हा धर्मा पाटलाच्या कुटुंबीयांनी काही आंदोलन काढू नये म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश होते. 

आज ही सगळी परिस्थिती बघत असताना छत्रपती आठवतात. त्यांचे बहाद्दर मावळे आठवताहेत...

इतिहासाची नुसते पाने पलटल्याने इतिहास घडत नसतो तर त्यासाठी रणमैदानात उतरावं लागतं.

आज शिवरायांचा मावळा पुन्हा एकत्र यायला हवा तो कोणत्याही एका जातीत नाही तर इथल्या अठरापगड जातीत आहे.शेवटी त्या मावळ्याला सांगणे आहे.  आता फक्त कपाळाला शिवराया सारखा टिळा लावून,अन मोठी दाढी वाढवून मिशीला ताव देऊन भागणार नाही. तर तुझा राजा आज एका विशिष्ट जातीत बंदिस्त केला गेलाय,तो कधीही असा एका जातीपुरता मर्यादित नव्हता.तूझ्या राजाला मुस्लिम विरोधी दाखवून आज कित्येक मुस्लिमांना मारलं जातंय, दलितांच्या वस्तीला पेटवलं जातंय, राजाला आता ह्या जातीच्या विळख्यातून बाहेर काढून तू विषमतावादी तत्वांच्या   विरुद्ध लढायला आणि शिवरायांचा संदेश गावोगावी घेऊन शिवविचारांचा जागर करण्यासाठी सज्ज हो.  


 -  अशोक बनकर

No comments:

Post a Comment

Pages