औरंगाबाद :
जी-20 परिषदेच्या निमित्ताने वुमेन-20 (W-20) इंडियाच्या बैठका छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आल्या असून, सोमवार (27 फेब्रुवारी, 2023) पासून या बैठकांना सुरुवात झाली आहे. ज्यात W20 इंडियाने नॅनो, मायक्रो आणि स्टार्टअप उद्योगांमध्ये महिलांचे सक्षमीकरण यावर पहिले सत्र आयोजित केले. W20 इंडियाच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांनी या सत्राचा प्रारंभ करताना महिलांना त्यांचे स्वतःचे उद्योग उभारण्यात आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करणारा iWN365 उपक्रम सुरु केला.
इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी सर्वच क्षेत्रातील महिलांनी अमूलला भारतीय दुग्ध उद्योगाचा कायापालट करण्यात कशी मदत केली याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर पॅनेल चर्चेत अमेरिकेतील व्हर्जिनिया लिटलजॉन दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या तर भारतातून जहनाबाई फुकन, तुर्कीच्या सेविम झेहरा काया, भारताच्या नताशा मजुमदार आणि जपानच्या सातोको कोनो उपस्थित होत्या. या सत्रात महिलांना कोणताही भेदभाव आणि पूर्वग्रह न ठेवता त्यांचा स्वतःचा उद्योग उभारण्याची मुभा देणारी चौकट आखण्यावर भर देण्यात आला. तर ‘हवामानानुसार कृतीत बदल घडवणाऱ्या महिलांची भूमिका’ या विषयावरील दुसऱ्या सत्रात जागतिक स्तरावर धोरण आखताना लिंगभेद करु नये हे अधोरेखित करण्यात आले. हवामान बदल संबंधी W-20 कृतीदलाच्या अध्यक्ष मार्टिना रोगाटो यांनी “हवामान बदल हा आता सिद्धांत राहिलेला नाही. दुर्दैवाने आता हे एक वास्तव आहे” यावर भर दिला.
दिवस अखेर भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या विषयावरील विशेष सत्राने झाली. या सत्राची सुरुवात डॉक्टर संध्या पुरेचा यांनी केली. या चर्चासत्रात डब्ल्यू 20 इंडोनेशियाच्या अध्यक्ष ऊली सिलाही, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता बन्सुरी स्वराज सहभागी झाल्या होत्या. "माझ्या भारत भूमीमध्ये आपले स्वागत आहे. या भूमीत समृद्धीचे प्रतिनिधित्व लक्ष्मी देवी करते. धैर्याचे प्रतिनिधित्व देवी दुर्गा करते आणि ज्ञानाचे प्रतिनिधित्व देवी सरस्वती करते" असे बन्सुरी स्वराज यावेळी बोलताना म्हणाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी उपस्थिताना शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती दिली.
No comments:
Post a Comment