जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 28 February 2023

जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाची औरंगाबाद लेणी व बीबीका मकबऱ्याला भेट

औरंगाबाद, दि. २८  - जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला भेट दिली.

शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या.


शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्या कारणाने संपूर्ण लेणी परिसर हा सुशोभिकरणामुळे अधिकच सुंदर दिसत होता. तर लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने छान रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.


तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरलेले होते. पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर  लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेणीच्या प्रत्येक भागाची इंतभूत माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.


औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून ७० फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण १२ लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात १ ते ५ पर्यंत दुसऱ्या गटात ६ ते ९ आणि तिसऱ्या गटात १० ते १२ लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिसऱ्या ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत.

पहिल्या गटात लेणी क्र. १ ही अपूर्ण लेणी आहे ज्या मध्ये व्हरांडा आणि स्तंभ आहेत लेणी क्र. २ आणि ५ या समकालीन संरचनात्मक मंदिराप्रमाणे दिसतात जे शैलकृत उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेत. लेणी क्र. ३ ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी लेणी आहे, हे एक महाविहार आहे. ज्यामध्ये प्रदक्षिणापथा सोबतच गर्भगृह आहे. या वरील स्तंभांवर पर्णसंभार, मिथुन शिल्प आणि जातक कथा कोरलेल्या आहेत. लेणी क्र. ४ हे हिनयान काळातील एकमात्र चैत्यगृह आहे.

दुसऱ्या गटातील लेणी ही पहिल्या गटाच्या उत्तर पूर्वेस सुमारे साधारणतः १ कि.मी. अंतरावर आहे. लेणी क्र. ६ अ आणि ७ विहार आहेत. जे तेथील विवरणत्मक शिल्पे आणि सुंदर प्रतिमांकरिता प्रसिध्द आहेत. लेणी क्र. ८ आणि ९ या अपूर्ण उत्खननामुळे आपल्याला लेणी निर्माण करण्याची प्रक्रिया माहीती होते. या गटातील लेणी प्रतिमा शिल्पांनी युक्त आहेत आणि औरंगाबाद लेण्यातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. यात बोधीसत्व, अष्टमहाभय, अवलोकितेश्वर, पट-प्रज्ञा देवी सोबतच बोधिसत्व, हारिती पंचिका, नृत्य वादनच्या दृश्यांचे पटल, महापरिनिर्वाणाचे दृश्य इ. भरपूर अंकन केलेले आहेत. स्तंभावर पर्णसंभार आणि भौमितिक आकृत्यांचे सुंदर अंकन केले आहे.

तिसऱ्या गटातील लेणी क्र. १० आणि १२ दुसऱ्या गटापासून थोडया अंतरावर उत्तरेकडे स्थित आहेत  लेणी क्र. १० आणि ११ अर्धनिर्मित लेण्या आहेत तर लेणी क्र. १२ एक विहार आहे.


औरंगाबाद लेणी पहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघडयाच्या वादनाने अतिशय उत्साहात करण्यात आले. त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केले. 


No comments:

Post a Comment

Pages