किनवट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या बाबत शासनाने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत देण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण केले आहेत. यात किनवट तालुक्यातील 5 हजार 075 शेतकऱ्यांच्या 4 हजार 627 हेक्टरचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासाठी तालूका प्रशासनाने 07 कोटी ५1 लाख 72 हजार 750 रुपयांची मागणी शासनाकडे केल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
संपूर्ण नांदेड जिल्हयासह किनवट तालुक्यात मार्च महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. यात जिल्हयातील जवळपास 11 तालुक्यांत बागायती क्षेत्रासह फळबाग, भाजीपाला, गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. किनवट तालुक्यातील अनेक गावांतील शेतांतल्या पिकांना याचा मोठा फटका बसला होता. सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले व तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांसह तालुक्यातील बोधडी, थारा, दिग्रस, चंद्रपूर, पिंपरफोडी, सावरी, धानोरा, पार्डी, येंदा, पेंदा, कोपरा, बोधडी ( खुर्द), सिंगारवाडी, इंजेगाव, सुंगागुडा आदी हानीग्रस्त गावांतील शिवारांना भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी नुकसानीचा प्राथमिक आढावा घेतला होता. रब्बीतील सोंगणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारी, मका,तीळ आदी पिके आणि फळपिकांमध्ये आंबा व केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. ही पिके हाताशी आली असतानाच बेमोसमी पाऊस, गारपिटीमुळे पिकांसह फळबागा, भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती.
आमदार भीमराव केराम यांनीही आपत्तीग्रस्त शेत शिवारांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर, नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान माजी आ.प्रदीप नाईक यांनीही तालुक्यातील नुकसान झालेल्या गावशिवारांना भेटी दिल्यानंतर, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाकडे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. अशा अस्मानी संकटामुळे सर्वत्रच शेतकऱ्यांची झालेली वाईट अवस्था ओळखून शासनानेही कृषी, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार शासकीय यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले आहेत. या आपत्तीत नांदेड जिल्हयातील 11 तालुक्यातील 36 हजार 543 शेतकऱ्यांच्या 21 हजार 579 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने तीन एप्रिल रोजी राज्य शासनाला कळविली असून, यासाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या 30 कोटी 52 लाख 12 हजार 685 रुपयांची मागणी केली आहे. यात किनवट तालुक्यातील तालुक्यातील 5 हजार 075 शेतकऱ्यांच्या 4 हजार 627 हेक्टरचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यामुळे, नुकसान भरपाईसाठी तालूका प्रशासनाने मागणी केलेल्या 07 कोटी ५1 लाख 72 हजार 750 रुपयांचा समावेश आहे.
सुधारित दरानुसार मिळणार भरपाई
राज्य शासनाने मागीलवर्षी नुकसानग्रस्तांना मदत देताना एनडीआरएफच्या प्रचलित दराच्या दुप्पट मदत दिली होती. तसेच दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टरपर्यंत मदत दिली होती. परंतु यात शासनाने कपात करून सुधारित दर लागू केले आहेत. यामुळे आता जिरायतीसाठी हेक्टरी 8 हजार 500 रुपये, बागायतीसाठी 17 हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 22 हजार 500 रुपयांची मदत मिळणार आहे. शिवाय ही मदतही दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच मिळणार आहे.
No comments:
Post a Comment