डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त नांदेडमध्ये दोन दिवसीय सार्वजनिक व्याख्यानमाला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 25 April 2023

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्त नांदेडमध्ये दोन दिवसीय सार्वजनिक व्याख्यानमाला

नांदेड, (प्रतिनिधी)- शहरातील विविध बौद्ध विहार आणि सर्व भीम जयंती मंडळाच्या वतीने दि. २६ आणि २७ एप्रिल रोजी नांदेडच्या कुसुम सभागृहामध्ये दोन दिवसीय सार्वजनिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सवानिमित्त या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. पूज्य भिख्खू विनय बोधीप्रिय महाथेरो यांनी ही माहिती दिली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान पूज्य भिख्खू विनय बोधीप्रिय महाथेरो भूषविणार आहेत. व्याख्यानमालेला संध्याकाळी ६ वाजता प्रारंभ होईल. बुधवार दि.२६ एप्रिल रोजी उदगीर येथील शिवाजी कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वंभर गायकवाड हे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर-एक आकलन" या विषयावर पहिल्या दिवशीचे विचार पुष्प ठेवणार आहेत. दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपात गुरुवार दि. २७ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. सुरेश वाघमारे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन व आजचे शिक्षण" या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करणार आहेत. नांदेड शहरातील मूलगंध कुटी बुद्ध विहार, विश्वशांती बुद्ध विहार, साकेत बुद्ध विहार, प्रज्ञापारमी बुद्ध विहार , हर्षनगर आणि पालीनगर येथील संबोधी बुद्ध विहार तसेच शहरातील सर्व भीम जयंती मंडळाच्या वतीने या दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी पुढाकार घेण्यात आल्याचेही पूज्य भिख्खू विनय बोधीप्रिय महाथेरो यांनी कळविले आहे. नांदेड शहरातील सर्व समाज बांधवांनी या  व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages