पाच हजार 940 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली ;ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल, यंदा उन्हाळी भूईमुगाचा पेरा घटला - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 5 April 2023

पाच हजार 940 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली ;ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल, यंदा उन्हाळी भूईमुगाचा पेरा घटला

किनवट,दि.05(प्रतिनिधी) : किनवट तालुक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात पिकं घेतली जातात. यावर्षी खरीप आणि रब्बीमध्ये पावसाचा फटका बसल्याने, शेतकऱ्यांनी उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी उन्हाळी पिकांना पसंती दिली आहे.  किनवट तालुक्यातील उन्हाळी हंगामासाठी यंदाचे सर्वसाधारण क्षेत्र 5 हजार 174 हेक्टर असून, तालुका कृषी कार्यालयाच्या अहवालानुसार यंदा शंभर टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे 5 हजार 940 हेक्टरवर विविध उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. त्याची टक्केवारी 114.80 भरते. त्यासोबतच ज्वारी व मका चारा पिकांचीही 160 हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

   दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून, सोयाबीन, तीळ व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालातून दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.  तालुक्यातील शेतकरी  गतवर्षापासून उन्हाळी पिकांमध्ये तृणधान्यात ज्वारी, मका तर गळीतधान्यात भुईमूग व तीळ पीक घेण्यात जास्त रस दाखवीत आहेत. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे वा प्रकल्पातील पाणी मिळू शकते अशा भागात उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहे.

  तृणधान्यातील उन्हाळी ज्वारीसाठी 1 हजार 676 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, 1 हजार 789 हेक्टर ज्वारीचा पेरा झालेला आहे. ज्याची टक्केवारी 106.74 आहे. मक्यासाठीचे क्षेत्र केवळ 927 हेक्टर असून, यंदा 1 हजार 208 हेक्टरवर अर्थात 130.31 टक्के पेरणी झालेली आहे. उन्हाळी भातासाठी 93 हेक्टर क्षेत्र असून, यंदा भाताची पेरणी अजूनतरी झालेली नाही.  गळीधान्यात भूईमूगासाठी स.सा.क्षेत्र 1,471 हेक्टर असून, यावर्षी पेरा कमी होऊन 1 हजार 033 हेक्टरवर अर्थात 70.22 टक्केच पेरा झालेला आहे. तिळासाठीचे क्षेत्र 784 हेक्टर होते त्यात वाढ होऊन तब्बल 1 हजार 185 हेक्टरवर तीळ पेरण्यात आलेला आहे. त्याची टक्केवारी 120.43 टक्के आहे. याशिवाय उन्हाळी मूग 34 हेक्टर, चारापिकात ज्वारी 63 हेक्टर, मका 97 हेक्टर, खरीप बियाण्यासाठी सोयाबीन 44 हेक्टर,  तर भाजीपाल्याची 328 हेक्टरवर लागवड झालेली आहे. सोबतच केळी 45 हेक्टर, ऊस 38 हेक्टर, टरबूज 35 हेक्टर, धने 12 हेक्टर, कांदा 6 हेक्टर तर मिरची 23 हेक्टरवर घेण्यात आली आहे. गतवर्षी उन्हाळी हंगामासाठी 4 हजार 659 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. यंदा त्यात 515 हेक्टर क्षेत्र वाढून सुद्धा यंदाची उन्हाळी पेरणी आतापर्यंत 114.80 टक्के झालेली आहे.


“भुईमूग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी यावेळी सोयाबीन, मूग व तीळ या पिकांवर जोर दिल्याने, भुईमुगाच्या पेऱ्यात घट आली आहे. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामग्रीचा  पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी शासनस्तरावरून व तालुका कृषी विभागाकडून पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन शेतकर्‍यांना दिले जाते.  आता शेतकर्‍यांनी येत्या खरीप हंगामासाठी रासायनिक खताचे नियोजन करून खरेदी करावे. त्यामुळे खताची कमतरता भासणार नाही.”


-    बालाजी मुंडे,तालुका कृषी अधिकारी, किनवट

No comments:

Post a Comment

Pages