किनवट, (प्रतिनिधी) : इस्लापूर पोलीसांसह महसूल विभागाच्या पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इस्लापूर पोलिसांच्या साहाय्याने रविवारी (दि.23) अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाळूचे टिप्पर पकडले. झाडाझडती घेऊन सदरील रेतीचे उत्खनन हे पूर्णत: गैरकायदेशीपणेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या आदेशावरुन रेतीसह टिप्पर हे जप्त करुन इस्लापूर पोलीस स्थानकात लावल्याचे सूत्रांकडून कळाले.
एम.एच.26 बी 9988 या क्रमांकाचे हे टिप्पर लोहा तालुक्यातील अंतेश्वर येथील असल्याचे निष्पन्न झाले. याच टिप्परमध्ये अवैध रेती येत असल्याची खबर मिळाल्यावरुन महसूल विभागाचे तलाठी केशव थळंगे, सुदर्शन बुरकुले, अंकुर सकवान, देवीदास कांबळे आणि पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष निवळे, सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे, पो.उ.नि.शिवाजी तोडेवाड, पो.कॉ.शिवाजी साखरे, वाहनचालक आजम व मडावी यांनी गावाबाहेर सापळा रचून हे टिप्पर पकडले, हे विशेष.
पोलीस आणि महसूल पथकाची ही संयुक्त कार्यवाही होती. टिप्पर लोहा तालुक्यातील असल्यामुळे ही अवैध रेती भरली कुठून? ही पहिलीच वेळ होती की, नेहमीचाच व्यवसाय होता ? हे आता अधिक तपासातून बाहेर येणार आहे. किनवट तालुक्यात रेतीचा सुकाळ असतांना, इतर तालुक्यातून रेती आणण्याचा प्रश्नच उदभवत नाही. कर्मचारी कितीही सजग असले तरी, चोरट्यांना मात्र बारा वाटा असतात. खबरीच्या सांगण्यावरून का होईना परंतु अशा कारवाया होणे गरजेचे असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
No comments:
Post a Comment