किनवट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; सलग दुसरे दिवशी पाच मंडळात पुनश्च अतिवृष्टी जुलै महिन्यातील ही सहावी अतिवृष्टी ; खरीपातील पिके भूईसपाट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 30 July 2023

किनवट तालुक्यात पावसाचा धुमाकूळ; सलग दुसरे दिवशी पाच मंडळात पुनश्च अतिवृष्टी जुलै महिन्यातील ही सहावी अतिवृष्टी ; खरीपातील पिके भूईसपाट

किनवट,(प्रतिनिधी) : तालुक्यात पाऊस उसंत घेण्याचे नाव घेत नसून, सतत कोसळधारा सुरूच आहेत. काल गुरूवारीसुद्धा पावसाची तुफान बॅटिंग होऊन, सलग दुसरे दिवशी तालुक्यातील पाच महसूली मंडळात पुनश्च अतिवृष्टीची  नोंद झालेली आहे. ही याच जुलै महिन्यातील सहावी अतिवृष्टी आहे. उर्वरीत चार मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. गुरूवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात तालुक्यातील नऊ महसूल मंडळात बरसलेला एकूण पाऊस 650.60 मि.मी. असून, त्याची सरासरी 72.29 मिलिमीटर आहे.


    याच जुलै महिन्यात झालेल्या तब्बल सहा अतिवृष्टीमध्ये  तालुक्यातील नऊ महसूली मंडळापैकी इस्लापूर मंडळात सर्वाच जास्त वेळा अर्थात पाचदा अतिवृष्टी झाली असून, जलधारा व शिवणी मंडळात चार वेळा, बोधडी, दहेली व उमरी बाजार मंडळात तीनदा, किनवट व सिंदगी मोहपूर मंडळात प्रत्येकी दोनदा तर मांडवी मंडळात एकदा अतिवृष्टी झालेली आहे. पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडल्या जाऊन पिकांचे अतोनात नुकसान तर झालेच आहे. सोबत तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमिनीतील सखल भागात पाणी साचून, तेथील पिकेही कुजून नष्ट झालेली आहे.



   शुक्रवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 56.0 (781.1 मि.मी.); बोधडी- 61.3 (778.3 मि.मी.); इस्लापूर- 101.8 (925.6 मि.मी.); जलधरा- 101.8 (778.8 मि.मी.); शिवणी- 101.8(824.5 मि.मी.); मांडवी- 48.8(566.4मि.मी.);  दहेली- 38.8 (722.1 मि.मी.), सिंदगी मोहपूर 71.8 (857.3 मि.मी.); उमरी बाजार 68.5 (660.5 मि.मी.).


      तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 6,894.6 मि.मी.असून, त्याची सरासरी 766.07 मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी मांडवी मंडळात झालेला आहे. तालुक्यात शुक्रवार दि.28 जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  457.9  मि.मी.असून, त्या तुलनेत 167.3 टक्के पाऊस पडलेला आहे. याचा अर्थ सरासरीपेक्षा 67.3 टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. 01 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 1026.58 मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात सरासरी 74.62 मि.मी. पाऊस पडलेला आहे.   गत वर्षी आजच्या दिवसापर्यंत 832.10 मि.मी.पाऊस पडला होता. आज रोजी पर्यंत पडणाऱ्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 181.72 एवढी होती.


   "सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय गत  एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे, या भूमिकेतून सदरील नवा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ज्या महसूली मंडळात अतिवृष्टी झालेली नाही परंतु सलग पाऊस होता, आता तेथील नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत नव्या निर्णयानुसार राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकते.

No comments:

Post a Comment

Pages