किनवट तालुक्यात खरीपाच्या पेरण्या 100 टक्के पूर्ण ; सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला मात्र ज्वारी,मूग,उडदाची अपेक्षित पेरणी नाही - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 5 August 2023

किनवट तालुक्यात खरीपाच्या पेरण्या 100 टक्के पूर्ण ; सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला मात्र ज्वारी,मूग,उडदाची अपेक्षित पेरणी नाही

किनवट,दि.05(प्रतिनिधी) : गत महिन्यातील सततच्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी वेग घेऊन, 24 जुलैपर्यंत तालुक्यातील पेरण्या पूर्णत: आटोपल्या असून, त्याची  टक्केवारी 101.64 आहे. किनवट तालुक्यासाठी नियोजन केल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिकांसाठी जे सर्वसाधारण क्षेत्र होते, त्या तुलनेत  नगदी पिकांमध्ये  सोयाबीनचा पेरा 110.56 टक्के तर कापसाचा पेरा 101.83 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.


      खरीप पेरण्यासाठी जून तसा कोरडाच गेला. पेरण्या करण्यासाठी  किमान 100 मि.मी.पाऊस  पडण्याची गरज  असते. मात्र तालुक्यात संपूर्ण जून मध्ये केवळ 50.50 मि.मी.पाऊस पडल्यामुळे पेरण्या रखडल्या  होत्या. जुलैमध्ये मात्र पाऊस सातत्याने बरसत राहिल्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला. मात्र खरीपातील मूग,उडीद ही पिके कमी कालावधीची अर्थात 65 ते  75 दिवसांची असतात. जूनमध्ये  पेरणी झाली असती, तर सव्वादोन  महिन्यानंतर मोकळी झालेली जमीन रब्बीसाठी उपलब्ध झाली असती. मात्र जून कोरडा गेल्यामुळे सर्व  नियोजन बारगळून, मूग, उडदाचा पेरा निम्म्यावर आला आहे. कारण अशावेळी आपत्कालीन पीक नियोजन करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नव्हता. हीच अवस्था  खरीप ज्वारीचीही झाली. 100 ते 120 दिवसात येणाऱ्या ज्वारीच्या पेरण्याही  उशीरा सुरू झाल्यामुळे, तालुक्यात खरीप ज्वारीचा पेरा नियोजनाच्या 25 टक्केही झालेला  नाही. तसेच  दुर्देवाने जुलैमध्ये  तालुक्यात तब्बल सहा वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे, पूर, शेतात पाणी साचणे, पिकांवर रोगराई व किडींच्या  प्रादुर्भावामुळे मूग, उडीद व ज्वारी ही पिके जवळपास शेतकऱ्यांच्या हातातून  गेल्यासारखीच आहेत तर अतिपावसामुळे कापूस व सोयाबीनची पाने पिवळी पडून रोगट झालेली आहेत.


       तालुका कृषी विभागाच्या दि.24 जुलैच्या अंतिम खरीप पीक पेरणी अहवालानुसार किनवट तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या 101.64 टक्के पेरणी झालेली आहे. किनवट तालुक्यातील खरीप हंगामासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 78 हजार 001 हेक्टर असून, यंदा 79 हजार 280 हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पिकांचे प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र पुढील प्रमाणे असून, कंसात त्याचे सर्वसाधारण क्षेत्र दिले आहे. कापूस 48,953 हेक्टर (48,072), सोयाबीन 20,125 हे.(18,203), भात 380 हे.(309),खरीप ज्वारी 558 हे.(2,249), बाजरी 56 हे.,राळा 37 हे.,  मका 235 हे.(194),तूर 6,312 हे.(6,627), मूग 642 हे. (1,212), उडीद 578 हे.(1,119), तीळ 05 हे.(16),  ऊस 61 हे.,केळी 29 हे.,हळद 778 हे.,मिरची 75 हे., पपई 01 हे.,भाजीपाला 455 हेक्टर.


        तालुक्यातील नगदी पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र हे दरवर्षी सर्वात जास्त असते. विशेष म्हणजे गतवर्षी झालेल्या कापसाच्या लागवडीच्या तुलनेत यंदाचा पेरा 15.62 टक्क्यांनी वाढलेला आहे तर सोयाबीनच्या क्षेत्रात गतवर्षीच्या  पेऱ्याच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्याने घट झालेली आहे. तालुक्यातील खरीप पेरणी पिकांच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यंदा भाताच्या लागवडीमध्ये 22.98 टक्क्याने वाढ झाली असून, खरीप ज्वारीचे क्षेत्र तब्बल 75.09 टक्क्यांनी घटले आहे. मक्याचे क्षेत्र 21.81 टक्क्यांनी वाढले असून, हळदीचा पेरा गतवर्षापेक्षा 387 हेक्टरने घटला आहे. यंदा बऱ्याच वर्षानंतर बाजरी व राळा ही पिके फार थोड्या प्रमाणात परत घेण्यात आली आहेत. पेरण्या तर झाल्यात मात्र पिके कोवळी असतांनाच वारंवार झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे  तालुक्यातील सर्वच पिके पार  जमिनदोस्त झाली आहेत. गत तीन-चार वर्षाप्रमाणे यंदाही निसर्ग शेतकऱ्यांच्या जीवावरच उठल्यासारखे चित्र आहे. खचून नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Pages