किनवट,दि.10 (प्रतिनिधी) : आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले युवासेनेचे नांदेड जिल्हा उपप्रमुख युवानेते प्रशांत कोरडे यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर व विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी त्यांची शिवसेना शहरप्रमुख (उत्तर विभाग) पदी नियुक्ती केली आहे. प्रशांत कोरडे यांच्या या नियुक्तीमुळे तरुण सैनिकात उत्साह संचारला असून पक्षाला बळकटी प्राप्त होणार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन प्रशांत कोरडे यांनी विद्यार्थीदशेत असताना शिवसेनेत प्रवेश केला होता. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किनवट सारख्या मागास दुर्गम भागात त्यांनी पक्षाला बळकटी देण्याचे काम केले. किनवट तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत जाऊन मार्गी लावण्याचा त्यांच्या धाडसी कार्याची आदित्य ठाकरे यांनी दखल घेऊन युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती. या काळात त्यांनी जिल्ह्यात युवकांची संघटनात्मक बांधणी केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ते परिचित असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने किनवट तालुक्यातील तरुण व युवा पिढीला पक्षाशी जोडण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर व विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी कोरडे यांची शिवसेना( उबाठा) गटाच्या किनवट शहरप्रमुख (उत्तर विभाग) पदी नियुक्ती केली आहे. 8 ऑगस्ट रोजी माहूर येथे शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयात कोरडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या नियुक्तीनंतर पक्षप्रमुखांसह वरिष्ठ नेत्यांनी ही जबाबदारी देऊन माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांच्यासोबत पक्ष वाढीसह आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत सर्वतोपरी प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया प्रशांत कोरडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माहूर तालुका प्रमुख उमेश जाधव, शहर प्रमुख नीरधारी जाधव किनवट युवासेनेचे तालुका प्रमुख अतुल दर्शनवाड आदी उपस्थित होते. एका तरुण,तडफदार युवा शिवसैनिकाची किनवट शहरप्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे युवा सैनिकात उत्साह संचारला असून शिवसेनेला बळकटी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment