फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याबद्दल एकास अटक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 17 December 2023

फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याबद्दल एकास अटक



किनवट (प्रतिनिधी) :  ‘फेसबुक’वर बनावट खाते तयार करून शहरातील एका मुलीचे आक्षेपार्ह फोटो अपलोड करून तिची बदनामी व विनयभंग केल्याप्रकरणी किनवट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


   शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या एका 50 वर्षीय फिर्यादीने आपल्या मुलीचा फेसबुकवर ‘फेक’ अकाऊंट तयार करून तिचे खाजगी व आक्षेपार्ह फोटो अपलोड करून तिचा विनयभंग करीत बदनामी केल्याची तक्रार किनवट पोलीस स्टेशनमध्ये दि.04 नोव्हेंबर 2023 रोजी दिली होती. या तक्रारीवरून भादवी 354,504,506 तसेच भारतीय माहिती व तंत्रज्ञान कायदा 66 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पो.नि.दीपक बोरसे हे हेडकॉन्स्टेबल गजानन डुकरे यांच्यासह जातीने तपास करीत होते. या गुन्ह्याच्या तपासात त्यांनी सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथील पो.उपनिरीक्षक दळवी व पो.हेडकॉन्स्टेबल विलास राठोड यांची तांत्रिक तपासासाठी मदत घेतल्यानंतर त्यात यश येऊन पिडित मुलगी राहणाऱ्या शिवाजीनगर परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशयाची सुई अटकली. त्यास ताब्यात घेऊन कडकरित्या विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिल्यामुळे या आरोपीस अटक करण्यात आली आहे. विनाकारण एका कुटुंबाची बदनामी करीत त्यांना मानसीक त्रास देणे व पिडित मुलीचा विनयभंग केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


     आज सोशल नेटवर्कींग साइट्स आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. लोकांच्या जगण्याचा भाग बनलेल्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटस्‌अप या प्रकारच्या सोशल मिडियाचा वापर तुलनेने सोपा आहे. त्यामुळे यांचा वापर महिलांसह आबालवृद्धांमध्ये मनोरंजनासाठी अधिक होतो. अशा प्रकारच्या सोशल मीडियावर  फेक अकाउंट तयार करून महिलांची, लहान मुलींची अथवा इतर कुणाचीही बदनामी केल्यास, त्यांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड केल्यास, जातीय- धार्मिक तेढ निर्माण केल्यास अथवा अफवा पसरविणारे मेसेजेस पाठवल्यास त्यांचे विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकरणात अडकलेल्या नागरिकांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून, या त्रासातून पिडितांची सुटका करणे सोईस्कर होईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages