जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नवीन मतदारांची नावे भरण्यासाठी विशेष मोहिम ; नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन , बिएलओ यांना मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 16 December 2023

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नवीन मतदारांची नावे भरण्यासाठी विशेष मोहिम ; नाव नोंदणीसाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन , बिएलओ यांना मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश

नांदेड,  :- 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मतदार यादी शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. रविवार 17 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात यासाठी विशेष मोहिम आयोजित केली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आपल्या मतदान केंद्रावर हजर राहण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये जिल्ह्यात घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये नांदेड जिल्ह्यात आढळून आलेली मयत मतदारांची संख्या, एकुण संख्या व प्रत्यक्षात वगळणी करण्यात आलेल्या मयत मतदारांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून आली आहे. तसेच जिल्ह्यात 18-19 वयोगटातील मतदारांची नोंदणी देखील समाधानकारक झालेली नाही. सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. 


रविवार 17 डिसेंबर रोजी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय प्रपत्रातील अहवाल बीएलओ यांच्या प्रमाणपत्रासह सायं. 6 वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.  

 

नवीन मतदारांची  नावे समाविष्ट करण्यासाठी, मयत मतदारांची नाव वगळण्यासाठी कुटुंबियांनी बिएलओ यांना संपर्क करावा. जिल्ह्यातील मतदार यादीत ज्यांची नावे नाहीत विशेषत: यात वय वर्षे 18 ते 19 वयोगटातील नावे नसलेल्या युवकांनी मतदान ओळखपत्रासाठी आपल्या जवळील मतदान केंद्रावर जाऊन नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.  


No comments:

Post a Comment

Pages