किनवट तालुक्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी ‘सीसीआय’ चे खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 31 December 2023

किनवट तालुक्यात कापसाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी ‘सीसीआय’ चे खरेदी केंद्र लवकर सुरू करण्याची मागणी

किनवट,दि.31(प्रतिनिधी): तालुक्यात सीसीआय (भारतीय कापूस महामंडळ) ने अद्याप खरेदी केंद्रे सुरू केली नसल्यामुळे, खुल्या  बाजारपेठेतील खाजगी व्यापारी हमी भावापेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी करीत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदील झालेला  शेतकरी या अल्पदरामुळे अधिकच नागवल्या जात आहे.


      तालुक्यातील कापूस पिकाचे पेरणी झालेले क्षेत्र 48 हजार 953 हेक्टर आहे. जून व  जुलैमधील पावसाच्या हुलकावणीमुळे या वर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्प्याटप्प्याने झालेली आहे.  पावसाळ्यातील विविध महसूल मंडळातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, मधेच पावसाचा पडलेला दीर्घखंड आदी कारणामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत गेले. परिणामी, रस शोषण करणाऱ्या कीडींसह, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे, खरीप हंगाम संकटात सापडला होता. पर्यायाने कोरड्या कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. त्यात शेतीमालातील सर्वच उत्पादित पिकांचा खर्च मागील काही वर्षांत अव्वाच्या सव्वा वाढलेला आहे. किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे पीक असलेल्या कापूस उत्पादकांना यंदा मजूर टंचाई आणि मजुरीच्या वाढलेल्या दराची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. वेचणीसाठी सरासरी 10 ते 15 रुपयांपर्यंत प्रतिकिलो चुकारा द्यावा लागत असून, मजूराअभावी आठ-आठ दिवसांची प्रतिक्षा करावी लागत असल्याचे समजते.  कापूस उत्पादनाचा खर्च सरासरी एकरी 30 हजारांवर पोहोचला आहे. काही भागात कीटकनाशकांची अधिक फवारणी केली असेल, तर 35 हजारांवर हा खर्च यंदा पोहोचलेला आहे.


    शासनाचा कापसाच्या मध्यम धाग्याच्या कापसाचा हमीभाव 6,620 तर लांब धाग्याचा 7,020 रुपये आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेत दसऱ्याच्या मुहूर्तावर 7 हजार  ते 7,200 रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती. हमीभावाच्या जवळपास हे दर असल्याने लवकरच वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त झाला. परंतु, पुढे नोव्हेंबर मधील मॉन्सूनोत्तर पाऊस आल्यामुळे फुटलेला कापूस झाडांवर भिजला. हा कापूस वेचणीसाठी मोठी कसरत करावी लागली. वेचलेला कापूस वाळवावा लागला. यातील काही कापूस पिवळसर होऊन प्रत खालावली. हा कापूस शेतकऱ्यांना अक्षरश: 4 हजार रुपयांपासून विक्री करावा लागला. पुढे याच पावसामुळे कापसाची प्रतवारी खराब झाल्याच्या कारणावरून दर एकदम 700 रुपयांनी घसरून 6 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आले. सध्या 6,800 पर्यंत प्रति क्विंटल खरेदी चालू आहे. ओल असल्याचे कारण देत शासनाच्या हमी भावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांकडून कापसाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत असून, तो अडचणीत सापडलेला आहे.


     आता कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी वेचणी हंगाम सुरू आहे. कोरडवाहू पट्ट्यात एकरी 4 ते 5 क्विंटलपर्यंत उत्पादकता येऊ शकेल, असा अंदाज आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे उत्पादन व झालेल्या खर्चाचा विचार केला तर कापूस उत्पादकांना खर्च भागवणेही अवजड दिसत असून,  वर्षभर मेहनत करून हातात एकरी पाच - सात हजार रुपये पडणेही मुश्कील झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. ‘सीसीआय’ च्या  खरेदीबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीत विचारणा केली असता, यासंदर्भात पत्रव्यवहार केला परंतु, अजून उत्तर प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.


‘‘कापसाचा हमीभाव 7,020 रुपये असा असला तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याहून कमी भाव मिळत आहे. सीसीआयने हमीभावाने कापूस खरेदी सुरू केल्यास, व्यापारी त्यांचे भाव हमीभावापेक्षा 500 ते 1000 रुपयाने वाढवतील. हमी केंद्र असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाला संरक्षण मिळेल; म्हणून आम्हीसुद्धा सीसीआयने लवकर खरेदीकेंद्र सुरू करावेत म्हणून पत्र पाठविले आहे.’’


-आमदार भीमराव केराम, किनवट-माहूर मतदारसंघ

No comments:

Post a Comment

Pages