देशोदेशी ज्ञानचारिका करीत भदंत आनंद कौसल्यायन यांनी बौद्ध धम्माचे तात्विक तसेच सांस्कृतिक स्वरूप अभ्यासले होते. वयाच्या २१व्या वर्षी घरातून बेघर होवून ते फिरत राहले. पंडित राहूल सांकृत्यायन यांच्या सहवासातून ते बौद्ध धम्माकडे वळले . पण त्यांच्या धम्मनिष्ठा अस्सल होत्या. भलेही ते कर्मठ नसतीलही परंतू ब्राम्हणवाद जातीवाद तसेच भांडवलशाहीच्या ते विरुद्ध आजीवन लिहत राहले. त्यांचे इथल्या समाजवादी म्हणवून घेणाऱ्या शी फारसे जुळले नाही. ते स्वभावतःच स्पष्टपणे विचार मांडणारे तसेच कोणाची भीडमूवर्त त्यांनी ठेवली नाही.
धर्मांतरानंतर अल्पावधीत डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाण्याने एक मोठीच पोकळी निर्माण झाली होती. ते चैत्यभूमीवर अंत्ययात्रेचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यामुळे त्यांच्यातला संवेदनाशील तसेच करुणामयी परिव्राजक विदर्भाच्या भूमीत स्थिरावला. त्यांना स्वभावताच दीनदुबळ्यांची सेवा करण्याची ओढ होती. त्यांनी पंजाबमधील सामाजिक आर्थिक दरी आणि त्यामुळे होणारे पीडण अनुभवले होते. स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा ते सहभागी झाले होते. त्यांच्या स्फूट लेखनातून ते चित्रण आले आहे. त्यांनी त्यांच्या लेखनी व वाणीतून उपरोध व विनोदप्रचूर बुद्धीने तत्कालीन चालीरीती अंधश्रद्धा यावर प्रहार केला.
ते पंजाब आणि महाराष्ट्र या दोन प्रदेशांना सांधनारा दुवा होते. त्यांनी Buddha and his dhamma चे हिंदी व पंजाबी भाषेत अनुवाद केला होता. बौद्ध साहित्याचा त्यांचा व्यासंग तर होताच शिवाय" वेदसे मार्क्स तक" मधून त्यांचे दर्शन आकलन व मांडणी ही अनुत्तर अशीच आहे. त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका आकर्षित करते."उन अछूतो तथा शुद्रो को मनु तथा शंकराचार्य ने जिन के लिये ज्ञान के दरवाजे सर्वथा बंद कर दिये थे" यातून त्यांची तत्वचिंतनाची भूमिका ही समतेसाठी संघर्षरत राहून न्याय्यबाजूने उभे राहण्याची होती. हे दिसून येते.
कठिण अथवा गहन विषय सरळ सोपा करुन मांडण्याची हातोटी भंतेजींना साधली होती. त्यामागे त्यांचे अपार कष्ट होते. बौद्धिक कष्टाशिवाय दर्शन समजून घेता येईल का ?भंतेजींचा पिंड हा ललित लेखकाचा होता. दर्शना विषयी खुद्द तेच म्हणतात " वह दर्शन भी क्या,जो इतना सरल हो जाय कि आसानी से समज मे आ जाय! " दर्शनशास्त्र अभ्यासने हे प्रारंभी जटील व आव्हानात्मकच वाटते. वेदापासून उपनिषदे सांख्यदर्शन ,चार्वाक दर्शन न्याय तथा वैशेषिक बौद्धदर्शनातील चार दर्शन प्रवाह हा सगळा प्रवास म्हणजे दर्शनाचे ध्यासपर्वच आहे. वेद शब्दप्रामान्य माणनारी ज्ञान व्यवस्था होती. चारही वेद हे संहिता म्हणजे संग्रह आहे असे स्पष्टीकरण भंतेंजी देतात. उपनिषद काळ हा बौद्धेत्तर असल्याचे म्हटले आहे.
दर्शनाचे अनेक उद्देश त्यांनीप्रतिपादले आहे. व्यक्तीच्या बौद्धिक पक्वतेसाठी दर्शन अध्ययन आवश्यकआहे. शिवाय बौद्धिक पक्वता आल्याशिवाय दर्शनही कळत नाही. हे पुस्तक म्हणजे गागर मे सागर आहे. त्यांच्या विचक्षण प्रज्ञाविष्कार म्हणजे हा ग्रंथ होय. जो नवशिक्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरला आहे.
जगातले एकून तत्वज्ञान ते कोळून प्याले होते.जग फिरुन आलेला हा निर्लोभी ज्ञान यात्रिक आंबेडकरीधम्माची पाठशाळा झाला होता. अनेक तरुण त्याकाळी बौद्ध भिक्खू होवून त्यांच्या सहवासात जीवनाचे धम्मायन समजून घेत होते.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर जागतिक स्तरावर टीका झाली. त्याने जराही विचलीत न होता त्यांचे पिटकीय संदर्भ देऊन तत्वसंगतीचे ठामपणे समर्थन केले. त्याची प्रस्तुतता सप्रमाण पटवून दिली. त्याचा प्रत्यय हिंदी अनुवाद व त्या ग्रंथ प्रतीची प्रस्तावनाअर्थात भंतेजीकृत नम्रनिवेदन किती विचारप्रवन आहे हे दिसून येते. सागराप्रमाणे विशाल असलेले पालिसाहित्य त्याचे सारगर्भ निवेदन एका ग्रंथातून करणे सोपे नाही.हा ग्रंथ बुद्धी आणि भावना दोन्ही पातळीवरुन समजून घेणाऱ्या धम्मानुयांचा विचार करुन लिहला गेला ही बाब भंतेजी अधोरेखित करतात. हे विशेष.डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म ही संकल्पना सामाजिक प्रतलावर आणल्याने त्याचे सामाजिक लोकशाहीचे पैलू उजागर झाले. ते उलगडून दाखवले. त्याचे मोल बौद्ध जगतात आज कळू लागले. परंतु त्याकाळात हे स्वागतशील आहे हे भंतेजीनी उद्घृत केले आहे. बौद्ध धर्म आणि बौद्धसमाज यांच्याबाजूने नागपूर येथील धम्मदीक्षा जेवढे महानकार्य होते तेवढेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे कार्य त्यांच्या लेखनीतून झालेली ही ग्रंथरचना होती. हे एका कसलेल्या समकालीन व्यवस्थेचे सम्यक भान असलेल्या पंडिताचा अभिप्राय होता.
धर्मांतरानंतर जी परिस्थिती पुढे आली ती भयंकर होती. धर्मांतरीतांची बौद्ध जाणीव जपणे ती समूहजाणीवेत रुजवणे अवघडच. त्याकाळी लोक धम्माच्या अंगणावाडीत होते. तेव्हा हरीविजय. शिवलिला अमृत व रामायण याचे पारायणे गावात चालत. मग हे धर्मांतरीत बौद्ध ते ऐकण्यास जात. ही बाब न लपणारी होती. हा समाज पुन्हा हिंदू धर्माकडे वळेल का? मग काय करायचे? मग हे घडू नये त्यासाठी त्यांची लेखनी अविरत झिजत राहली. डाॕ आंबेडकरांच्या एकूणच कार्याचे आपण वारस आहोत. त्यामुळे तो वारसा प्रामाणिकपणे जपणे हे आपले उत्तर दायित्व आहे ही भूमिका ते प्राणपणाने जगले.
पी लक्ष्मी नरसू यांचे बौद्ध धम्म का सार हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ८3व्या वर्षी अनुवादित केला. डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका इंग्रजी आवृत्तीसा आहे. त्या ग्रंथाचा लाभ जनमाणसाला व्हावा म्हणून भंतेजीनी राष्ट्रीय भाषेत तो आणला. अविरत बौद्ध धम्माची साहीत्य सेवा ते करत राहले. बौद्ध धम्माचा साहित्य आणि सांस्कृतिक आयाम उजागर व्हावा यासाठी भंतेजीचे योगदान अपूर्व आहे. तत्वज्ञानाच्या बोजड मांडणीतून तो मुक्त करत तो धागा न सोडता त्याचे जीवन व्यवहारात अनुससरन सुगम्य व्हावे यासाठी त्यांची धडपड होती. त्यांची भाषा वाचनीय रसपूर्ण होती.
बौद्ध धम्मातही काही पारंपरिक पायंडे पडले आहेत . त्यामध्ये काळसापेक्ष बदल अपेक्षित आहेत. डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्व आणि नियम असा भेद करीत सोडवणूक केली आहे. खरे तर स्वतःच्या सद् विवेकाचा वापर योग्यप्रकारे करता आला पाहिजे .ही मोकळीक दिली आहे. बौद्ध धम्म हे एक दर्शन आहे. तो केवळ इतर धर्मासारखा कर्मकांडाचा सांगाडा नाही त्यामुळे इतर धर्माबाबत जी उदासीनता तरुणामध्ये दिसून येते ती कशामुळे? तर आधुनिक विचारधारामुळे धर्माचे विरोधाभासी स्वरूप पुढे आले आहे ते बौद्ध धम्मास लागू होत नाही. त्याची प्रमुख चार कारणे भंतेजी सांगतात. एखादा व्यक्ती कितीही थोर असला तरी त्याच्या विचाराने संतुष्ट होऊन थांबने हे आजच्या प्रगतशील' चतुर्मुखी' प्रवृत्ती च्या लोकांना रुचनारे नाही. गीतेत तर" मामेकं शरणं व्रज"असे म्हटले आहे. हे तत्त्व मुलतः व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्याला मर्यादा घालणारे आहे. त्यामुळे लोकांना ते पटेनासे झाले आहे.या उलट बौद्ध धम्मात अतित अनागत तसेच प्रत्युत्पन्न असे तिन्ही काळातील बुद्धांना नमन केले जाते. ते व्यक्तीशरण्य नाही गुणात्मक शरण आहे. हा गुणात्मक फरक बौद्ध आणि ईतर धर्मात दिसतो. बौद्ध व्यक्तीने त्याला कल्याणकारी जे वाटेल ते कुठूनही घ्यावे हे औदार्य बौद्ध धम्माने मानवजातीस दिले आहे. हे विशेष .
धम्म हा स्वानुभूतीनिष्ठतेचा आधार घेऊन जगभरात प्रतिष्ठित झाला आहे. ग्रंथप्रामाण्य अथवा अपौरुषिकतेचे दावे बौद्ध धर्म करीत नाही.त्यामुळे उत्क्रांतीवासोबत धम्म चालताना दिसतो.भदंत आनंद कौसल्यायन म्हणतात, बुद्ध को आप बिना किसी भय के विकासवाद का समर्थक कह सकते है । विज्ञान आणि समकालीन विचारधारा याच्याशी साधर्म्य आणि सुसंगत राहून धम्मविचार देश आणि काळाच्या मर्यादा ओलांडून पुढे जातो आहे.हे भंतेनी त्यांच्या हयातभर प्रतिपादले आहे. आज काँटम थेअरी तसेच कालावकाशाचे वैज्ञानिक शोध धम्माच्या सैद्धांतिकतेशी एकवाक्यता सांगत आहे.
समकालीन साहित्य प्रवाहास वास्तववाद उर्फ यथार्थवादाने प्रभावित केले आहे. ऐहिक जगण्यातले दुःख आणि शोषण हे आजच्या कथा कविता कादंबरी व नाटकाचा विषय होताना दिसते. हे जागतिक प्रतलावरुन होत आहे. आधुनिक कादंबरीवर त्याचा प्रभाव दिसतो. बौद्ध विचार हा यथार्थवादी आहे. भंतेनी त्यावरही आपली मते निर्भिडपणे नोंदवली आहेत. यावरुन त्यांची दृष्टी किती व्यापक होती हे दिसून येते. सातासमुद्रापलिकडे मुसाफिरी करुन आलेला एका भिक्खुतला संवेदनाशील लेखक हा चौकस तसेच तसेच स्वयंप्रज्ञ बाण्याचा होता. त्यांची दृष्टी सतत उन्नतगामी राहली आहे. एक कमालीचा ऋजू होता.म्हणून त्यांनी अपने को बदलो ,दुनिया को बदलो । असे म्हटले आहे, हे जगाच्या पूनर्रचनेचे समन्वय सूत्रच नव्हे काय? बुद्धाने त्यालाच उत्तम पुरुष म्हटले आहे. जो स्वतः सह इतरांच्या कल्याणासाठी झटतो. भंतेजी त्याचे एक उत्तम उदाहरण होते. अकुशल कर्म करण्याचे ज्याला भय वाटते तोच भिक्षू होय. डाॕक्टर इंजीनिअर वकील प्रोफेसर किंवा भिकारी हे सर्वलोक जे काही करतात ते पोटासाठी. पण भिक्खू मात्र बहूजन हितासाठी धडपडतो. हे महदंतर अतिशय तर्कशुद्धपणे त्यांनी प्रतिपादले आहे.
बौद्ध धर्म ः एक बुद्धीवादी अध्ययन " हा ग्रंथ भंतेजींच्या तर्कशुद्ध जाणीवेचा व्यापक परिप्रेक्ष्य काय आहे याचे विलोभनीय दर्शन घडवून देतो. स्वकीयांच्या प्रश्नांची चिकित्सा करणे हे नाजूक काम आहे. पण समुहाचे intellectualisation करणेही गरजेचे. कायम मौन पाळून कसे चालेल? ही चर्चा सुरू झाली. सुरू राहील. बौद्धिक भावनिक व मानसिक मोकळेपणाचा आयाम त्यास होता. तोच कायमही राहावा किमान लोकशाहीसंमुख संवादाचा चिरपरीचय ते देत राहील .
भंतेजींच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेणे हे कठीणसाध्य कार्य आहे. त्यांचा आवाका दीपवून टाकणारा आहे.येवढ्या उंचीचा श्रमन आपल्या ज्ञान व संस्कृतीचे संभरण करण्यासाठी आपल्याला लाभला . धम्मोदयाची पहाट समृद्ध करणाऱ्या या महान श्रमनास आज जयंतीदिनी त्रीवार अभिवादन. आपणास त्यांच्या महत्तेचा विसर पडू नये!
- सुभाष गडलिंग ९५४५२६५२७९
No comments:
Post a Comment