आंबेडकरी साहित्य सृष्टीचे गगनाध्यक्ष - यशवंत मनोहर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 March 2024

आंबेडकरी साहित्य सृष्टीचे गगनाध्यक्ष - यशवंत मनोहर

       महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अस्पृश्य, शुद्रातिशुद्रांसह स्त्रिया तसेच समाजव्यवस्थेच्या सर्वच स्तरांतील माणसांचे, माणसांच्या आयुष्याचे कल्याण केले. त्यांच्या जगण्याला माणुसकीचा नवा अर्थ दिला. मानवतेसाठी, सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय चळवळी उभ्या केल्या. एवढेच नव्हे तर आंबेडकरी संस्कृतीलाही जन्म दिला. ही संस्कृती भारतीय संविधानाशी बहुतांशी आणि बुद्ध संस्कृतीशी एकरूप झालेली आहे. आंबेडकरी चळवळीचे सांस्कृतिक संविधान म्हणजे आंबेडकरी साहित्य होय. या साहित्याने आंबेडकरी चळवळीची भक्कम पायाभरणी करण्यासाठी मोठाच हातभार लावला आहे. या संबंधाने आजवरचे समस्त आंबेडकरी साहित्य आंबेडकरी साहित्य सृष्टीचे उगमस्थान ठरते. या साहित्यानेच तिचे सौंदर्य खुलवले. तिचे दलितपण घालवले. उजेडाचे विश्वकुळही निर्माण केले. यात जगातील अनेक इहवादी प्रज्ञा प्रतिभांचा समावेश आहे. परंतु भारतीय संविधानाच्या मूल्यक्षितिजातून नवी जीवनदृष्टी निर्माण करणारे,  शोषित पीडितांच्या दडपलेल्या आवाजांना गगनभेदी शब्द देणारे, आपल्या साहित्यातून माणसाच्या विजयाची गाथा लिहिणारे, स्वयंप्रकाशित माणसांचा अजिंक्य म्हणून गौरव करणारे, निरामय माणसाच्या महानायकपणाचा उद्घोष करणारे, इतकेच नव्हे तर माणसाला गौणत्व प्रदान करणाऱ्या सर्वच छळ छावण्याविंरुद्ध निर्णायक लढा पुकारणारे आणि या सगळ्यासाठी आंबेडकरी साहित्य शब्दांची निर्मिती करणाऱ्या सृष्टीचे गगनाध्यक्ष यशवंत मनोहर हेच आहेत.


       मनोहर सर हे इहवाद केंद्रस्थानी ठेवून लेखन करतात. हा इहवाद त्यांना कोणाच्याही परावलंबनात राहू देत नाही. तसेच ते कोणाचेही अंकित होत नाहीत. त्यांचे लेखन केवळ ही व्यवस्था नाकारणारे नाही तर व्यवस्थेसकटच तिचे तत्वयुव्ह आणि भाषाही नाकारणारे आहे. कारण या सर्व गोष्टींचा स्वीकार केल्यानंतर कोणतीही समता, बंधुता, भगिनींता वा न्याय संभवतच नाही, असे ते म्हणतात. कोणालाही गुलाम दुय्यम परके वा उणे मानणारी व्यवस्था वंदनीय मानणे म्हणजे गुलामी दुय्यमत्व वा उणेपणा मान्य करणेच असते तिची आधारभूत तत्वे प्रमाण मानणे म्हणजे दुयमत्वाला अनुमती देणेच असते आणि व्यवस्थेच्या भाषेशी चिकटून राहणे म्हणजे सरळ सरळ गुलामी स्विकारणे असते. या विरोधात लेखन करणे म्हणजे बंड पुकारणे असते. अशा शब्दांची निर्मिती करणे गरजेचे असते. त्यांनी सातत्याने ही निर्मिती केली. त्यांचे अनेक विद्यार्थी, अनेक शिष्य तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे शब्द सतत शिकत असतात. चळवळीचे प्रारुप समजून घेत असतात. यशवंत मनोहर हेच एक तत्वज्ञान आहे तेच आधी समजून घ्यावे असा शिकणाऱ्यांचा अट्टाहास असतो. त्यांचा इहवाद हेच ते महासत्य मानतात. तो कोणालाही संभ्रमात टाकत नाही. खोट्या जगण्याशी कोणालाही जोडत नाही. कोणालाही अविवेकात ढकलत नाही. तो सर्वांना जीवनाच्या प्रखर सत्यात उभे करतो. ही प्रखर सत्यता त्यांच्या लेखनातून दिसून येते.


   

            आस्तिकांनी मोठ्या मेहनतीने अज्ञानाचा शोध लावला. आस्तिक विचारव्युव्ह माणसांचे सर्व पातळ्यांवर परकीयीकरण करते. आस्तिकांनी परलोकाचा खोटा आदर्शवाद निर्माण केला. मग यातून आस्तिकांविरोधात नास्तिकांचा संघर्ष सुरू झाला. नास्तिकता आणि आस्तिकता हाच मूलभूत मूल्यसंघर्ष आहे. माणसे जन्मतः नास्तिकतच असतात. विषमसत्ताक आणि शोषणसत्ताक शक्ती माणसांवर आस्तिक्य लादते. मग त्यातून विषमता, शोषण, फॅसिझम, वर्चस्व, अध्यात्म हा एलिनेशन निर्माण करणारा युटोपिया निर्माण होतो. हा माणसांचे अवमूल्यन करणारा आहे. यांच्याविरोधात आपल्या लेखणीतून ते त्यांचा युटोपिया उभा करतात. स्वतःला पारखे होण्याआधी माणूस एका एकमय सौंदर्यवास्तवाचाच नागरिक होता. यापासून त्यांचे अपहरण केले गेले. माणूस माणसापासून तोडण्यात आला. माणसामाणसांत परभाव निर्माण झाला. यातून माणसाने माणसाला गुलाम करण्याची किंवा आपल्यापेक्षा हीन समजण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती इतकी खोलवर रुजली गेली की, गुलामच गुलामीचे संरक्षक बनायला लागले. त्यामुळे गुलामी चिरंतन झाली आणि शोषणसत्ताक वर्ग निर्धास्त झाला. मात्र परलोकवाद्यांच्या तुरुंगातून माणसाला बाहेर काढणे ही मनोहरांच्या लेखनाची मानसिकता आहे. ही मानसिकता त्यांच्या शब्दांना युद्ध पुकारण्याचे, लढण्याचे आणि विजयी होण्याचे प्रशिक्षण देते. चैतन्यवाद, आस्तिकता हे अभिजनांच्या हिताचे राजकारण असते. या राजकारणाविरोधात मनोहर हे आपल्या प्रशिक्षित शब्दांचे शस्र करुन आपले तत्त्वचिंतन ठेवित आले आहेत.


        खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे बोलून, मानून जगण्याची किंवा वागण्याची शिकवण मनोहरांना कधीही मिळालेली नाही. सत्याला सत्य आणि असत्याला असत्या मानण्याची ताकद  त्यांच्यात अनेक विचारवंत तथा तत्वचिंतकांकडून त्यांना लाभली आहे. त्यांच्या लेखनावर विशेषतः बुद्ध, लोकायत, साॅक्रेटीस, मार्क्स, ज्योतिबा फुले, सार्त्र, रसेल, रामस्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञावंतांचा प्रभाव आहे. अशा लाखो प्रज्ञावंतांनी सर्वोच्च नीतीचा इहवादी आदर्श सांगितला असल्याचे ते म्हणतात. म्हणूनच त्यांचे लेखन अधिक मजबूत होत राहिले आहे. शंका घेण्याचे, प्रश्न विचारण्याचे, चिकित्सा केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याचे आणि सद्विवेकाला पटेल तेवढेच पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य या इहवादानेच दिले आहे. नास्तिकता म्हणजे सेक्युलॅरिझम आणि सेक्युलॅरिझम म्हणजे इहवाद अशी त्यांची धारणा आहे. समता, न्याय, बंधुता - भगिनिता, धर्मातीतता, विज्ञाननिष्ठा आणि निरंतर पुनर्रचना ही चैतन्यवाद्यांना मान्य नसलेली मूल्ये इहवाद्यांचीच विश्वमान्य मूल्ये आहेत. हीच मूल्ये भारतीयही आहेत आणि वैश्विकही आहेत. ही साध्यमूल्ये आहेत आणि त्यांना स्थलकालाच्या मर्यादाच नाहीत. ही मूल्ये जगाच्या हिताची नाहीत, असे म्हणणारी संकुचित अस्तिकता मनोहरांनी कदापिही मानलेली किंवा तसूभरही मान्य केलेली नाही. हे त्यांच्या लेखनातून अभ्यासायला तर मिळतेच परंतु त्यांच्या जीवनवृत्तीचे ते अमोघ वैशिष्ट्यच आहे. अशा मान्यतेचे अत्यंत प्रखर विरोधकच ते आहेत. 


         यशवंत मनोहर म्हणजे आंबेडकरी सौंदर्यदृष्टीची एक महान फॅक्टरी आहे. त्यांच्या आंबेडकरमय झालेल्या मेंदूतून सतत नव्या शब्दांची निर्मिती होत असते. आमच्यासारखे कैक तर या शब्दांवरच गुजराण करीत असतात. ही भट्टी आमच्यासाठी भरणपोषणाची कार्यशाळाच आहे. अगदी वर्गातच नव्हे तर जीवनाच्या शाळेत शिकावयाचे शब्द त्यांच्याकडूनच ग्रहण केले जातात. त्यांचा मेंदू शाबूत असेपर्यंत ही प्रक्रिया निरंतर चालू असणार आहे. कधी ते विचार करतात, कधी त्यांचा मेंदू कधी परवानगी देतो, कधी त्यांच्या मुखातून वा लेखणीतून शब्द बाहेर पडतो याची आमच्यासारखे वाटच पाहत असतात. असे लोक मनोहरी साहित्य वाचून मनोहरी सौंदर्य प्राप्त करतात. ते मनोहरांचे समग्र साहित्य आपलेच मानतात. त्यांची विचारधारा आणि शब्दप्रवाहता अंगिकारतात. यशवंत मनोहर या लेखकाने दिलेले शब्द, निर्माण केलेले साहित्य आमचेच;  आमच्याच पूर्वजांचेच साहित्य आहे. आम्हीच या साहित्यसंपदेचे वारसदार आहोत आम्ही मानत आलो आहोत. त्यांच्या शब्दांना सतत अभिवंदन करीत आलो आहोत. कारण ते माणसासाठी लिहितात. माणूसच त्यांच्या गगनाचा केंद्रबिंदू आहे. ते माणसासाठीच उजेडाची भाषा लिहितात. माणसाच्या मनातील विद्रुपतेचे निर्मूलन करणाऱ्या सौंदर्याची मांडणी करतात. त्यांचे लेखन म्हणजे माणसांच्या मेंदूत पसरलेल्या अंधाराला सूर्य शिकवणारा शब्दच आहे. हे शब्द मनोहरी साहित्य शिकणाऱ्या माणसांसाठी क्षितीजाला फुटणारी नवी पालवीच असते. ही पालवी माणसांसाठी सूर्यसावलीच आहे. माणसाला लागलेले ग्रहण सोडविण्यासाठी युद्ध लिहिणाऱ्या या सूर्यकुळातील कवीकरिता अधिकाधिक आयुष्य जगण्यासाठी मंगल कामना व्यक्त करतो. थांबतो.


     - प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.

          मो. ९८९०२४७९५३

No comments:

Post a Comment

Pages