किनवट ता. २६ : उन्हाळ्याच्या दिवसात आदिवासींना रोजगार मिळवून देणारा मोहफुल व्यवसाय सध्या सुरू झाला आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासींना बहुगुणी उपयोगासाठी असलेले मोहाचे झाड है दैनंदिन गरजा भागविण्यासाठी महत्वाचे स्रोत मानले जाते. मार्च महिन्यात ग्रामीण भागात मोहफुल वेचणीला सुरुवात झाली आहे.
||श्रद्धा व परंपरेशी जुळली नाळ||
मोहाच्या झाडाची फांदी, पाने, फळे, फुले, साल आणि लाकूड यांचा उपयोग केला जातो. मोहाची फळे आणि फुले विकून आर्थिक उत्पन्न मिळवल्या जाते. मोहाच्या झाडाची वाढ साधारण ५० फुटांपर्यंत असते. तर झाडाचे आयुर्मान ७० वर्षापर्यंत असते. मोहाच्या झाडाचे लाकूड सागाच्या लाकडापेक्षा कठीण आहे. विविध प्रकारच्या वस्तू मोहाच्या लाकडापासून तयार करतात. त्याच्या पानांपासून पत्राळी व डोणे बनवितात. आदिवासींची श्रद्धा व परंपरा या झाडांशी जुळलेली असल्याने या झाडांचे ते रक्षण करतात.
किनवट तालुक्यातील जंगल व्याप्त परिसरात बहुसंख्य आदिवासी कुटुंबे आहेत. या जंगलात मोहाची झाडे मुबलक प्रमाणात आहेत. आदिवासी जनतेच्या अनेक विधी परंपरेमध्ये मोहाच्या झाडारा विशेष महत्त्व आहे. सोबतच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, वार्षिक उत्पन्नासाठी या मोहफुलाचा वापर केला जातो.
||औषधी गुणधर्म असलेले वृक्ष||
मोहाचे झाड हे औषधी गुणधर्म असलेले झाड आहे. मोहाच्या फुलांमध्ये साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगल्याप्रकारे असते. शुद्ध अर्काचे खोकल्यासाठी औषध म्हणून उपयोग होतो. मोहाचे बिया त्यांना टोरी म्हणतात. या बियांपासून तेल काढले जाते. याचा उपयोग आदिवासी जमातींमध्ये स्वयंपाक करण्यासाठी करतात. तेलाचा उपयोग मालिश करण्णाासाठी करतात. मोहाच्या बियांची जी पेंड उरते तिला जाळून मच्छर पळवून लावले जाते.
शेतीची कामे आटोपल्यानंतर ग्रामीणांना मोहफुल हे उत्पनाचे साधन आहे.
No comments:
Post a Comment