नांदेड : 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी उद्या 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी एकूण 10 हजार 637 अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज शासकीय तंत्रनिकेतन येथे 87 -नांदेड दक्षिण व 86 -नांदेड उत्तर मतदार संघासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासनातर्फे मतदान साहित्य हस्तांतरीत करुन दुपारपर्यत मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले.
आज सकाळी 7.30 वाजता पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय कर्तव्यासाठी सज्ज असलेले झोनल अधिकारी, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांची मतदान साहित्य हस्तगत करण्याची लगबग सुरु होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपले आदेश, मतदान केंद्राबाबत माहिती, ओळखपत्र हस्तगत करणे, मतदान केंद्राचा मार्ग, आपल्या गटातील अधिकारी कर्मचारी कोण आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी लगबग दिसून आली. यावेळी कार्यरत कर्मचा-यामध्ये वेगळा उत्साह व जबाबदारीची जाणीव दिसून आली. याठिकाणी सर्व कर्मचारी शिस्तीमध्ये प्रत्येक साहित्य घेताना दिसून आले. मतदान साहित्य हस्तगत करुन दुपारच्या सुमारास पोलिंग पार्ट्यां मतदान केंद्राकडे रवाना झाल्या. 11 ला भोजनानंतर सर्व पोलिंग पार्ट्यां आपआपल्या बूथवर रवाना झाल्या. आज दुपारनंतर पोलिंग पार्ट्या व सुरक्षा बघणारे पोलीस सर्वजण दुपारनंतर संध्याकाळपर्यत आप-आपल्या केंद्रावर पोहचणार आहेत. आज रात्री केंद्रामध्येच त्यांचा मुक्काम असून सकाळी 7 वा. नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्र सज्ज होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सांयकाळी 6 पर्यत आहे. उद्या रात्री पूर्ण मतदान झाल्यानंतर सर्व पोलिंग पार्ट्या पोलिंग युनिट परत करण्यासाठी केंद्रात येणार आहे.
शासकीय तंत्रनिकेतन येथील मैदानावर मतदान केंद्राचे रुट प्लॉन बोर्ड, मतदान साहित्य वाहतुकीसाठीच्या बसच्या रांगा, मोठ मोठे मंडप, साहित्य वितरणाचे टेबल असे भव्य नियोजन प्रशासनातर्फे केले होते. तसेच स्ट्रॉग रुममधून इव्हीएम मशीन बाहेर काढण्यासाठी आयोगाच्या सूचनेप्रमाणे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिका-यांनी स्ट्रॅाग रुममधून इव्हिएम मशिन बाहेर काढून पोलिंग पार्ट्यांना हस्तांतरीत करण्यात आल्या.
नांदेड 86- उत्तर व 87- दक्षिण मतदार संघासोबतच आज 85- भोकर, 89-नायगाव, 90-देगलूर, 91- मुखेड या मतदार संघासाठी सहा.निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलिंग पाटर्यांना मतदार साहित्यांसह त्या—त्या बुथकडे रवाना केल्या आहेत.
नांदेड लोकसभेचे मतदान एकूण 2 हजार 62 मतदान केंद्रावर होत आहे. यासाठी 10 हजार 637 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साहित्य वितरण केंद्राला भेट देवून कर्मचा-यांशी संवाद साधला. तत्पुर्वी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट प्रशासनाने घेतले असून हे उदिष्टपूर्ती करण्यासाठी मतदारांनी मोठया प्रमाणात बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन केले. 10 हजारावर कर्मचारी व 75 दिवसापासून दिवसरात्र कर्मचा-यांची मेहनत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लागली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठया संख्येने नागरिकांनी बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment