किनवट : बोधडी बु. शिवारातील शेतात शनिवारी (दि.13) एका शेतकऱ्याची चार अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. पोलिसांनी वेगात तपास करीत त्या चारही आरोपींना अटक केली आहे. त्यातील मुख्य सूत्रधार हा मयत रामच्या पत्नीचा भाऊ असून, शेतीच्या धुऱ्यालगत गुरे चारण्यास मज्जाव केला म्हणून झालेल्या भांडणातून राम केंद्रेची हत्या केल्या गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांकडून समजले. चारही आरोपींना न्यायालयाने मंगळवारी पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मयताच्या पत्नीचा भाऊ दयानंद जायभाये, नागेश उत्तम कराड( वय ३३) , गणेश मनोहर मुसळे( वय २७) आणि राजू रमेश गाडेकर ( वय २४), राहणार सर्व बोधडी बु. अशी या चार आरोपींची नावे आहेत. सुरुवातीस संशयावरून दयानंदला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तोंड उघडून सर्व घटनाक्रम सांगितला . त्यानुसार दयानंद जायभाये याचा भाऊजी राम हा त्याच्या शिवारालगत दयानंद याला गुरे चारण्यास मज्जाव करीत होता.याच कारणावरून दोघांत अनेकदा वादही झाला होता. या वादातून दयानंद याने भाऊजी राम केंद्रे याचा काटा काढण्याचे ठरविले. शनिवारी रात्री दयानंद जायभाये याने त्याचे उपरोल्लेखित तीन साथीदार मिळून बोधडीतील एका ढाब्यावर पार्टी करीत रामा केंद्रेच्या हत्येचा कट रचला होता असे, त्याने सांगितल्यानंतर इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. शनिवारी रात्री साडेनऊ वाजता या आरोपींनी रामच्या शेतात जाऊन त्यास मोबाईलद्वारे बाहेर बोलावून घेतले होते. रामने मेव्हण्याने बोलावले असे आई गयाबाईस सांगून घराबाहेर गेल्यानंतर, काही वेळातच त्याच्या आईस रामच्या जोर-जोरात आई-आई अशा आरोळ्या ऐकू आल्यामुळे त्या घावत बाहेर गेल्या. तेव्हा या आरोपींनी रामच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला होता आणि दगडांनीही त्यास ठेचले होते. त्यानंतर आरोपींनी प्रत्यक्षदर्शी म्हणून गयाबाईचाही गळा आवळून व मारहाण करून गंभीर जखमी केले होते. ती निपचित पडल्याने मेली असे समजून ते निघून गेले. रविवार 14 जुलै रोजी सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर घटना उघडकीस आली. गयाबाई रात्रभर जखमी अवस्थेत घराबाहेर पडून होती. मयताची सासरवाडी सावरी येथील असून मागील दोन वर्षांपासून पती व पत्नीमध्ये पटत नसल्यामुळे पत्नी आपली मुलगी व मुलासोबत हैद्राबाद येथे खाजगी काम करीत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे रामची मन:स्थिती बिघडून तो थोडा व्यसनाधीनही झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली. बोधडीला यापूर्वीही खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले यांनी या प्रकरणी सजगपणे पूर्ण झोकून देऊन तपास करीत घागेदोरे मिळविले. सदर मारेकरी दुसरे दिवशी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्याच्या बेतात होते. मात्र, पोलिसांच्या चौकसपणामुळे चौघा मारेकऱ्यांच्या अल्पावधीतच मुसक्या आवळल्या गेल्यामुळे पोलिसांचे कौतुक केल्या जात आहे.
No comments:
Post a Comment