अण्णा भाऊ साठे यांची वैचारिक ओळख पुसून टाकण्याचा डाव हाणून पाडा - सुबोध मोरे यांचा घणाघात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 3 August 2024

अण्णा भाऊ साठे यांची वैचारिक ओळख पुसून टाकण्याचा डाव हाणून पाडा - सुबोध मोरे यांचा घणाघात

कन्नड :

     कन्नड नगरपरिषदेच्या राममनोहर लोहिया वाचनालयाच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जिवन कार्यावर माननीय सुबोध मोरे यांचे व्याख्यान १ऑगस्ट २०२४ ला आयोजित करण्यात आले. 

    अण्णा भाऊ यांचा सहवास मोरे यांना लाभला. डाव्या, आंबेडकरी चळवळीशी अण्णा भाऊ साठे यांची जैविक बांधिलकी होती,त्याच चळवळीशी सुबोध मोरे यांची बांधिलकी असल्याने मोरे यांनी अण्णा भाऊंचे यथार्थ आकलन व्याख्यानातून मांडले.

      अण्णा भाऊंच्या संदर्भात अनेक लेखक, विचारवंतांनी जे अप्रस्तुत, विपर्यास करणारे लेखन केले त्याचे साधार खंडन मोरे यांनी केले.

      अण्णा भाऊ यांनी शाळेचे तोंड पाहिले नाही,मात्र मुंबईतील डाव्या, आंबेडकरी चळवळीच्या परिचयातून त्यांची वैचारिक जडणघडण झाली.त्यामुळे ते लिहिते झाले.अण्णा भाऊंनी सुरवातीला वगनाट्ये लिहिली.

       पारंपरिक गणगौळणीला फाटा देत त्यांनी कामगार, दलित वर्गाशी बांधिलकी असलेले वगनाट्य लिहिले.तत्कालीन जगातील सर्व घडामोडींकडे ते डोळसपणे पहात होते.

      मॉस्को,व बंगालच्या घडामोडींवर त्यांनी पोवाडा लिहिला,रशियन,बंगाली भाषेत त्यांचा लेखनाचा अनुवाद झाला.रशियाने त्यांना रेडिओत नोकरीची संधी देऊन स्थायिक होण्याचा प्रस्ताव दिला पण त्यांनी मायदेशच निवडला.

     अण्णा भाऊंची आर्थिक परिस्थिती उत्तर काळात उत्तम झाली होती.शासनाने त्यांना गोरेगाव येथे प्रशस्त घर दिले होते.चित्रपटाचे मानधन मिळत होते, कम्युनिस्ट पक्ष त्यांना फुलटायमर म्हणून मानधन देत होता. त्या काळात त्यांना महिना तिनशे रुपये मानधन मिळत होते.

     कम्युनिस्ट पक्षाने त्यांचा यथोचित सन्मान केला.त्यांचे लेखन पक्षाच्या नियतकालिकात प्रकाशित केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत या नियतकालिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध केले. बाबासाहेब यांच्या हयातीतच ( निर्वाण होण्याच्या दहा वर्ष आधी)जग बदल घालून घाव गेले सांगून मज भीमराव,असे कवन लिहिले.

      बाबासाहेबांचा वैचारिक वारसा त्यांनी स्विकारला होता. 

अण्णा भाऊंचा कॉम्रेड असा वैचारिक परिचय पुसून त्यांना केवळ साहित्यरत्न शाहीर असे मर्यादित, संकुचित करण्याचे काम स्वार्थी राजकारण्यांकडून होत आहे.

      बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्यात स्पर्धा लावून जातीय ध्रुविकरण करण्याचे षडयंत्र सुरू आहे.

       अण्णा भाऊंचा पुतळा मॉस्कोला उभारण्याची घोषणा करण्यात येते,पण त्यांच्या देशात त्यांचे विचार मारून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

      अण्णा भाऊंनी धर्मांध शक्ती आणि भांडवलशाही यांना शत्रू मानले होते.जग बदल घालूनी घाव या कवनाचा अर्थ हे धर्मांध, भांडवलशाहीचे जग बदलणे असा आहे.अण्णा भाऊंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समताधिष्ठित देश घडवायचा होता.त्यासाठी त्यांनी लेखणी प्रजली. त्यांच्या कथा कादंबरीत सगळ्या जातसमुहाचे चित्रण आहे,त्यांचे नायक,नायिका लढाऊ आहेत.

व्यवस्था शरण नाहीत.

       अण्णा भाऊ बुलबुलतरंग वाद्य उत्तम वाजवत होते,त्यांनी मॉस्कोत व्हॉयोलिन वाद्य शिकण्याचा प्रयत्न केला.त्यांना मांजरी पाळण्याची आवड होती....


     अण्णा भाऊंचे खरे विचार व साहित्य प्रस्थापित साहित्यिक आणि राजकारण्यांनी जगासमोर येऊ नये यासाठी प्रयत्न केले.परंतू डाव्या आंबेडकरी चळवळीने ते प्रसिद्ध केले.१९५८ च्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच ईप्टा या संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष होते.

       शाळेचे तोंड ही न पाहिलेल्या अण्णा भाऊंच्या साहित्यावर जगातील विविध देशांतील विद्यापीठात पीएचडी संशोधन सुरू आहे.म्हणून त्यांचा जन्मदिवस अक्षर दिन म्हणून साजरा करावा,ज्या मुंबईत त्यांनी चळवळ उभी केली, लेखन केले त्या मुंबईत त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला त्यांचे नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

       या प्रसंगी डॉ.प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान झाले.अध्यक्षस्थानी कृषीभूषण डॉ सिताराम जाधव होते.प्रास्ताविक प्रशासक नंदकिशोर भोंबे यांनी केले.सुत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.आभार प्रविण दाभाडे यांनी केले.


No comments:

Post a Comment

Pages