किनवट : संजय गांधी, श्रावण बाळ तसेच इंदिरा गांधी वयोवृद्ध योजनेअंतर्गत नव्याने दाखल झालेल्या 486 प्रस्तावांपैकी 418 पात्र प्रस्तावांना संजय गांधी निराधार योजना समितीने मंजुरी दिली असून, या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीचा हा सर्वाधिक आकडा असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मारोती भरकड यांनी दिली. दाखल प्रस्ताव वेळेत मंजूर झाल्यामुळे तालुक्यातील निराधार व वयोवृद्ध नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
निराधार व्यक्ती तसेच वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ तसेच इंदिरा गांधी वयोवृद्ध योजनेअंतर्गत प्रति माह दीड हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येते. किनवट तालुका हा आदिवासी अतिदुर्गम, मागास तालुका असून, या तालुक्यात निराधार व वयोवृद्ध नागरिकांची संख्या जास्त आहे. मारोती भरकड यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून या तिन्ही योजनांमध्ये गतिमानता आली आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ते स्वतः गावोगावी फिरून जनजागृती करत प्रस्ताव भरून घेत आहेत. वरील तीनही योजनेअंतर्गत तालुक्यात सध्या एकूण 5 हजार 567 लाभार्थी असून, त्यानंतर नव्याने 486 प्रस्ताव समितीकडे दाखल झाले होते. या संदर्भात अध्यक्ष भरकड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची नुकतीच बैठक संपन्न झाली असून, या बैठकीत प्राप्त 486 प्रस्तावापैकी संजय गांधी निराधार योजनेतील 231, श्रावण बाळ योजनेतील 104 व इंदिरा गांधी वयोवृद्ध योजनेतील 83 अशा एकूण 418 पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. 68 प्रस्ताव त्रुटीमुळे वगळण्यात आले असून, पूर्तता झाल्यानंतर या प्रस्तावांनाही पुढील बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
खरोखर निराधार व वयोवृद्धांचे प्रस्ताव त्वरित मंजूर होऊन वेळेत शासनाचे अर्थसहाय्य मिळत असल्यामुळे, निराधार व वयोवृद्ध नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या बैठकीस तहसीलदार शारदा चोंडेकर, गटविकास अधिकारी वैष्णव, समितीचे सदस्य गंगाराम गड्डमवार, गजानन पाटील कोल्हे, शेखर चिंचोळकर, मनीषा चौधरी
बबलु नाईक, कर्णेवार मॅडम, शुभम पवार, तथागत रिंगणमोडे यांच्यासह कर्मचारी उपास्थित होते.
तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करून त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देणे हाच माझा हेतू आहे. आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील कुठलीही खरोखरची निराधार किंवा वयोवृद्ध व्यक्ती या योजनांपासून वंचित राहणार नाही याची आम्ही कटाक्षाने दक्षता घेत आहोत. पात्र लाभार्थ्यांनी वरील तीनही योजनेचा लाभ मिळविण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करावेत व काही अडचण उद्भवल्यास आ.केराम यांच्या ‘लोकार्पण’ कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मारुती भरकड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment