किनवट : समाजात अनेक जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. आगामी पोळा,गणेशोत्सव , अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे सण साजरे करतांना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची सर्व नागरिकांनी काळजी घेत धार्मिक सलोखा व सद्भावना कायम ठेऊन, हे सण व उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन येथील तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी केले.
गुरूवारी (दि.29) सकाळी 11 वाजता येथील तहसील कार्यालयात आयोजिलेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, माहूरचे तहसीलदार किशोर यादव , पो.नि.सुनिल बिर्ला, माहूरचे पो.नि. मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सहा.जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या शांतता समितीच्या बैठकीस पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाच्या अत्यावश्यक कामकाजामुळे त्या उपस्थित राहू न शकल्यामुळे, ही बैठक तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत उपस्थितांना संबोधित करतांना डिवायएसपी रामकृष्ण मळघणे म्हणाले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे, सर्व गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्यावे, गणेशोत्सवा दरम्यान डिजे वाजविण्यावर बंदी असून, ध्वनीवर्धकाचा आवाज मर्यादित ठेवावे व मंडळाचे सर्व कार्यक्रम रात्री दहापर्यंतच ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. पो.नि.सुनील बिर्ला यांनी बोलतांना गणेशोत्सवात मंडपामध्ये व मिरवणुकीदरम्यान कोणीही मद्य प्राशन करू नये, तसेच कुठेही महिलांची छेडछाड होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तसेच वर्गणी मागताना कोणालाही सक्ती करू नये असे आवाहन केले. दरम्यान, उपस्थितांपैकी काही नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करण्यात आले.
यावेळी एसडीओ कार्यालयातील प्रतिनिधी शिवकांता होनवडजकर इस्लापूर,मांडवी,सिंदखेड, माहूर येथील सर्व एपीआय, किनवट व माहूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांचेसह व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष दिनकर चाडावार, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, विनोद भरणे, शिवराज राघूमामा, जहीरोद्दीनखान, मारोती सुंकलवाड,अजय कदम, किरण ठाकरे, भावना दिक्षित, विवेक ओंकार, शैलैश गटलेवार, विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment