किनवट : तालुक्यात मागील काही दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी (ता.१९) तालुक्यातील काही मंडळात दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील बोधडी मंडळात हलका तर इतर आठ मंडळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. मात्र, पावसाचा जोर लगेच दुसऱ्या दिवशी ओसरला. मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासात तालुक्यातील नऊ महसूल मंडळात बरसलेला एकूण पाऊस २८२.९ मि.मी. असून, त्याची सरासरी ३१.४३ मिलिमीटर आहे.
तालुक्यात १ ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर परवा राज्यभरात पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. मुंबईच्या प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राने सोमवारी दुपारी एक वाजता नांदेड जिल्ह्यासाठी आरेंज अलर्ट जारी करून विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली होती. जी की, तंतोतंत खरी ठरली असून, जिल्हयातील उमरी तालु्क्याच्या धानोरा मंडळात अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड, मुखेड, किनवट, माहूर, उमरी व अर्धापूर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे.
तालुक्यातील अनेक भागात मागील १७ ते १८ दिवसापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर आदी पिके वाळत होती. झाडांना फुले-पाती लागण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्यामुळे, उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत होते. काही शेतकरी पिकांना उपलब्ध असलेले पाणी देऊन कशीबशी पिके तगवीत होते. या पावसाने कोरडवाहू जमिनीतील पाण्याअभावी सुकून मरगळलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळालेले आहे.
मंगळवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- ४६.३(८०१.५ मि.मी.); बोधडी- ०६.८ (५१२.१ मि.मी.); इस्लापूर- ३३.५ (६०९.२ मि.मी.); जलधरा- ११.५ (८२४.० मि.मी.); शिवणी- २८.३(६१०.८ मि.मी.); मांडवी- ३५.०(७३४.३मि.मी.); दहेली- ३८.० (६४८.६ मि.मी.), सिंदगी मोहपूर ४२.५(८०९.४ मि.मी.); उमरी बाजार ४१.० (७११.७ मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस ६,२६१.६ मि.मी.असून, त्याची सरासरी ६९६ मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात मंगळवार ता.२० ऑगस्टपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस ६७६.६ मि.मी.असून, त्यापेक्षा थोडासाच जास्त पाऊस प्रत्यक्षात पडलेला आहे. त्याची टक्केवारी १०२.८७ आहे.
१ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा वार्षिक सरासरी पाऊस १०२६.५८ मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात सरासरी ६७.८० मि.मी. पाऊस पडलेला आहे. गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत ८८६.७० मि.मी.पाऊस पडला होता. आज रोजी पर्यंत पडणाऱ्या अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी १३१.०५ एवढी होती.
No comments:
Post a Comment