किनवट : आठ दिवस सततच्या पावसानंतर काल थोडं आकाश निरभ्र होऊन सूर्यदर्शन झाले होते. मात्र, ते दृश्य औट घटकेचे ठरून परत संध्याकाळी सर्वत्र आभाळ भरून येऊन दमदार पाऊस झाला. तालुक्यातील सिंदगी मोहपूर मंडळात यंदाची दुसरी तर तालुक्यातील तिसऱ्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुधवारी (दि.३१) सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार तालुक्यांतील नऊ मंडळातील एकूण पाऊस २६८.२ मि.मी.असून, त्याची सरासरी २९.८ मि.मी.येते. या सोबतच शेजारच्या माहूर तालुक्यातील वानोळा व वाई या दोन मंडळातही अतिवृष्टी झालेली आहे.
राज्यात गेले काही दिवस ओसरलेला पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचे संकेत असल्याचा अंदाज हवामान विभागाने काल व्यक्त केला होता. काल मंगळवारी तालुक्यातील नऊ पैकी इस्लापूर, जलधारा व शिवणी मंडळ वगळता इतर सहा मंडळात मुसळधार पाऊस कोसळला आहे. किनवट मंडळात अतिवृष्टीची नोंद होण्यासाठी केवळ अडीच मि.मी.पाऊस कमी पडला आहे. किनवट तालुक्यात या जुलै महिन्यातच आतापर्यत झालेल्या तीन अतिवृष्टीमध्ये पहिली ८ जुलैला जलधारा मंडळात पुढे दुसरी १६ जुलैला जलधारा व सिंदगी मोहपूर मंडळात तर ३१ जुलै रोजी तिसरी अतिवृष्टी परत सिंदगी मोहपूर मंडळात झालेली असून, अशाप्रकारे जलधारा व सिंदगी मध्ये प्रत्येकी दोनदा अतिवृष्टी झालेली आहे. सततचा पाऊस व दोन अतिवृष्टीमुळे शेतातील सखल भागातील खरीप पिकांमध्ये पाणी साचून अनेक भागातील पिके सडली असून, मुळेसुद्धा कुजून पाने पिवळी पडून रोगट झाली आहेत. तसेच उताराकडे सतत पाणी वाहून शेतातील पिकांसकट मातीही वाहून गेल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.
बुधवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- ६२.०(६६०.६ मि.मी.); बोधडी- १९.८(४४४.४ मि.मी.); इस्लापूर- ३.० (५२६.३मि.मी.); जलधारा- ३.५ (७४६.० मि.मी.); शिवणी- ३.५(५०१.१ मि.मी.); मांडवी- २८.३(६०७.३ मि.मी.); दहेली- ४३.८(५३२.० मि.मी.), सिंदगी मो. ७१.३ (६८९.५ मि.मी.); उमरी बाजार ३३.० (५८०.४ मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस ५,२८७.६ मि.मी.असून, त्याची सरासरी ५८७.५१ मि.मी.येते. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी बोधडी मंडळात झालेला आहे. तालुक्यात बुधवार ता.३१ जुलै पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस ४८६.७ मि.मी.असून, त्या तुलनेत सरासरी १०१.२ मि.मी.पाऊस जास्त पडलेला आहे. त्याची टक्केवारी १२०.७९ येते.
१ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान किनवट तालुक्यात पडणारा सरासरी वार्षिक पाऊस १०२६.५८ मि.मी.असून, या अनुषंगाने आतापर्यंत तालुक्यात ५७.२७ टक्के पाऊस पडलेला आहे. गतवर्षी आज रोजीपर्यंत तालुक्यात पडलेला एकूण पाऊस ७६९.३० मि.मी. असून, त्याची टक्केवारी १५८.०६ होती.
No comments:
Post a Comment