आडवाटेचे प्रवासी या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. अशोक बेलखोडे यांच्याशी मुक्त संवाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 30 October 2024

आडवाटेचे प्रवासी या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. अशोक बेलखोडे यांच्याशी मुक्त संवाद


ठाणे : आनंदवाटा प्रतिष्ठान व सत्कर्म परिवार यांनी आयोजित केलेल्या  आडवाटेचे प्रवासी हा कार्यक्रम रविवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी - मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे संपन्न झाला.कार्यक्रमातील प्रथम सत्राची सुरवात स्वानंद कलाप्रसारक केंद्रातील विद्यार्थ्याच्या 'गणेश वंदना' या नृत्याविष्काराने झाली. 'खेळ मांडियला' व साने गुरुजींची 'खरा तो एकची धर्म' ह्या प्रार्थनेवर नृत्य माध्यमातून त्यांनी सामजिक संदेश दिला.सत्कर्मच्या श्रीमती श्रध्दा साळी यांनी श्रद्धेय बाबा आमटे यांची 'शृंखला पायी असू दे' ही भावपूर्ण कविता सादर केली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची सुरवात ज्येष्ठ समाजसेवक,समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक श्री.संजय मं.गो व साने गुरुजी रुग्णालय किनवट चे संस्थापक डॉ.अशोक बेलखोडे व प्रेक्षक प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.


आनंदवाटाचे श्री रवींद्र नी.ता यांनी डॉ. अशोक बेलखोडे यांचे स्वागत केले.सत्कर्मचे श्री संजीव साळी यांनी प्रास्ताविक सादर केले.बाबा आमटे व साने गुरुजी यांच्या प्रेरणेने किनवट,जिल्हा नांदेड येथे समाजकार्य करणाऱ्या डॉ. अशोक बेलखोडे यांची व त्यांच्या कार्याची ओळख शहरवासियांना व्हावी. हे कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट असल्याचे नमूद केले.आनंदवाटाचे श्री रवींद्र निर्मला तानाजी,श्रीमती शरयू कुंभार व सत्कर्मचे श्री संजीव साळी यांच्या हस्ते डॉ.अशोक बेलखोडे यांना वस्त्र व पुषगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी कळवा येथील पती पत्नी - श्री. मीनेष कोळी व सौ.गुंजन कोळी यांना नुकताच मलेशिया येथे विशिष्ट क्रिडाप्रकारात आयर्नमॅन हा पुरस्कार मिळाला तसेच पारसिक हिल येथे वृक्षारोपण व वृक्ष संगोपन अशा पर्यावरण क्षेत्रातील 

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ अशोक बेलखोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सदर प्रसंगी - हॅलो फाउंडेशनचे डॉ क्रांती रायमाने, स्वानंद कला प्रसारक केंद्र च्या श्रीमती स्वाती  कोळळॆ ,सत्कर्म परिवाराच्या श्रीमती श्रध्दा साळी, डॉ.प्रतीक्षा बोर्डे यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.

मुक्तसंवादाच्या मुख्य कार्यक्रमात हॅलो फाउंडेशनचे  डॉ.क्रांती रायमाने यांनी डॉ .अशोक बेलखोडे यांची मुलाखत घेतली.

डॉ.अरुण गद्रे यांचे 'किनवटचे दिवस' हे पुस्तक वाचून किनवटचे आव्हान स्वीकारले.

"मरे पर्यंत किनवट सोडणार नाही" असे वचन बाबा आमटे यांना दिले.

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात एक लाखावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या. आदिवासी स्त्रियांना बाळंतपणाच्या फेरीपासून मुक्त केले.पुरुष कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करत नाहीत याबद्दल खेद व्यक्त केला.डॉक्टर असल्याने रुग्णाच्या गंभीर परिस्थितीनुसार विविध शस्त्रक्रिया केल्या. ३० वर्षाच्या प्रदीर्घ काळातील रुग्णसेवेचे टप्पे उलगडत किनवट च्या आरोग्य स्थितीचे दर्शन घडविले.समाजात सर्वांगीण प्रगती व्हावी याकरीता चित्रकला स्पर्धा,व्याख्यानमाला विज्ञान शिबिरे ,संगीत महोत्सव आयोजित केले.शाळा महाविद्यालय सुरू केले.

आपल्या नंतर सुद्धा किनवट तालुक्यात-वेगवेगळ्या शस्त्रक्रिया,डायलिसिस सेंटर, ब्लड बँक सारख्या विविध आरोग्य सुविधा एका छत्राखाली देण्यासाठी तसेच ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात.यासाठी साने गुरुजी मल्टी स्पेशालिट हॉस्पिटल  प्रकल्प हाती घेतला असून ७५ % टक्के काम पूर्ण झाले आहे.२५ % काम बाकी असून.पुढील ७ ते ८ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो असे नमूद केले.आर्थिक मदतीबरोबरच आरोग्य क्षेत्रातील मनुष्य बळ,हिशेब लेखन,तंत्रज्ञ यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगीतले व श्रोत्याना या उपक्रमात आपापल्या परिने सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी

आनंदवाटा प्रतिष्ठान व सत्कर्म परिवार यांचे तर्फे साने गुरुजी मल्टी स्पेशालिटी  रुग्णालयास रू २१.०००/- चे अर्थसहाय्य करण्यात आले.सदर कार्यक्रमात श्रद्धेय बाबा आमटे यांच्या भारत जोडो यात्रेतील - शुभांगी,नफीसा, चंद्रकांत,सुजाता,पुरुषोत्तम आवर्जून उपस्थित होते.

तसेच आनंदवन संबधित व इतर सामजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.प्रतीक्षा बोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन

रविंद्र निर्मला तानाजी यांनी मानले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages