किनवट : गोकुंदा ते चिखली बु. या मार्गावर गस्त घालीत असतांना, वनपथकाने संशयावरून एका ऑटोरिक्षास अडविले असता, त्यात अवैध कटसाईज सागवान आढळून आल्याने ऑटोसह अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे. सोबतच ऑटोतील दोन आरोपींपैकी एकास ताब्यात घेतले असून, दुसरा फरार झाला होता; त्यालाही आज बुधवारी पकडण्यात आले आहे. सदरील घटना मंगळवारी (दि.12) दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे.
सागवान तस्करीसाठी कुख्यात असलेल्या चिखली बु. ते गोकुंदा मार्गावरून नेहमीच संधी साधून सागवान तस्करी केली जाते. त्यामुळे या मार्गावर वनविभागाची सतत तीक्ष्ण नजर असते. मंगळवारी वनपथकाद्वारे न्याहाळणी चालू असतांना, चिखली बु.कडून येणाऱ्या एका झाकलेल्या ऑटोबाबत (क्र. टीएस 16 युबी 7832) संशय आल्याने, त्याचा पाठलाग करून त्यास थांबविण्यात आले. तपासणीमध्ये 0.3286 घनमिटर भरलेले तब्बल 48 अवैध सागवान नग आढळले. ज्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे 6 हजार 933 रुपये किंमत होते. सुमारे 40 हजाराचा ऑटो आणि अवैध सागवान मिळून एकूण 46 हजार 933 रुपयांचा मुद्देमाल वनकर्मचाऱ्यांनी जप्त केला. ऑटोतील दोन आरोपीपैकी एक पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, त्यातील पकडलेल्या आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर फरार झालेल्याची माहिती मिळवीत त्यालाही आज बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध वनगुन्हाची नोंद करण्यात आली.
सदर कार्यवाही नांदेड येथील उपवनसंरक्षक केशव वाबळे, येथील सहाय्यक वनसंरक्षक जी.डी. गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) पी.एल.राठोड, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.ए.काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलीचे वनपरिमंडळ अधिकारी एम. एन.कत्तूलवार, किनवटचे वनपरिमंडळ अधिकारी एस.एम.कोंपलवार, वनरक्षक बालाजी झंपलवाड, ए.के.फोले, वाहन चालक बाळकृष्ण आवले, बी.टी.भुतनार, वनमजूर शेख नूर आदी वनकर्मचाऱ्यांनी यशस्वी केली.
No comments:
Post a Comment