छत्रपती संभाजीनगर, दि.८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार दिन येत्या मंगळवारी (दि.१४) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने विद्यापीठाच्या नाटयगृहात प्राचार्या डॉ.इंदिरा आठवले (नाशिक) यांचे 'नामविस्तारानंतरची आव्हाने' सकाळी १०ः३० वाजता विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी भुषविणार आहेत. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, नितीन जाधव सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी केले आहे.
गीत भिमायण
याच कार्यक्रमात ’गीत भिमायण’ या संगीत प्रकल्पातील २१ व्या गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पद्मश्री पंडित सुरेश वाडकर यांची ध्वनीचित्रफित यावेळी सादर करण्यात येणार आहे. तसेच व्याख्यानानंतर विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, गुणवंताना पदक वितरण, क्रीडा महोत्सवातील विज्येत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
रक्तदान शिबिर
नामविस्तार दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ नाटयगृहात सकाळी १० ते दुपारी २ या दम्यान हे शिबीर होईल. रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद सोमवंशी यांनी केले.
'भारतीय सैन्य दलाची यशोगाथा’ चित्रप्रदर्शन
नामविस्तारदिनाच्या निमित्ताने भारतीय सैन्यदलाची यशोगाथा या भव्य चित्रप्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. सैन्यदला संदर्भातील २५० दुर्मिळ चित्रे, छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार असून नाटयगृहातील दालनात हे प्रदर्शन दोन दिवस सर्वांसाठी खुले राहील. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. तर यावेळी कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भीमगीत स्पर्धा
नामविस्तारदिन' निमित्ताने भीम गीत गायन स्पर्धा १३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता विद्यार्थी विकास विभाग येथे संपन्न होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
No comments:
Post a Comment