किनवट तालुक्यातील रब्बीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या दुप्पट मक्याची पेरणी सरासरीच्या चौपट ; 29 हजार 663 हेक्टरवर झाली पेरणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 10 January 2025

किनवट तालुक्यातील रब्बीचा पेरा सरासरी क्षेत्राच्या दुप्पट मक्याची पेरणी सरासरीच्या चौपट ; 29 हजार 663 हेक्टरवर झाली पेरणी


किनवट  : रब्बी हंगामासाठी पोषक वातावरणामुळे तसेच रब्बीची पेरणी वेळेत सुरू झाल्याने या हंगामात किनवट तालुक्यातील रब्बीच्या सरासरी क्षेत्राच्या दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.


          तालुका कृषी विभागाच्या रब्बी अंतिम पेरणी अहवालानुसार यंदाचे किनवट तालुक्यातील रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र 14 हजार 800  हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात 29 हजार 663 हेक्टरवर अर्थात दुपटीपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झालेली आहे. या रब्बी हंगामातील पिकांत सर्वात जास्त क्षेत्र हरभऱ्याचे असून, त्यापाठोपाठ अनुक्रमे गहू,मका व शेवटी ज्वारीची पेरणी झालेली आहे.


          तालुक्यात कडधान्यात मोडणाऱ्या हरभरा पिकासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 08 हजार 193 हेक्टर असून, प्रत्यक्षात दीडपटीपेक्षा जास्त 12 हजार 358 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी 150.84 इतकी येते. तालुक्यात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे, कोरडवाहू शेती कसणारे शेतकरी खरीपातील सोयाबीनचे पीक निघाल्यानंतर रब्बी हंगामामध्ये कमी पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात म्हणून हरभरा पेरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. तृणधान्यामध्ये गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र 03 हजार 205  हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात 07 हजार 082 हेक्टरवर पेरणी झाली आहे. जी की दुपटीपेक्षा जास्त असून, त्याची टक्केवारी 220.97 इतकी आहे.


        यंदा तालुक्यात मक्याची पेरणी विक्रमी झाली असून, तिचे सर्वसाधारण क्षेत्र 01 हजार 391 हेक्टर आहे. पेरणी तब्बल 07 हजार 082 हेक्टरवर झालेली असून, त्याची टक्केवारी 492.24 इतकी येते. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या पाचपटीच्या जवळपास येते. त्यापाठोपाठ ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 01 हजार 832 हेक्टर असून, पेरणी 137.94  टक्के म्हणजे 02 हजार 527 हेक्टरवर झालेली आहे. इतर तृणधान्यासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र केवळ 74 हेक्टर असून, त्याची पेरणी शंभर टक्क्यापेक्षा जास्त 82 हेक्टरवर झालेली आहे. त्याची टक्केवारी 137.94 आहे.  इतर कडधान्यासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 78 हेक्टर असून, यंदा  केवळ 44 हेक्टरवर त्याचा पेरा झाला आहे.


          दशकभरापूर्वी किनवट तालुक्यातील रब्बी हंगामात तेलबियांचा (गळीतधान्य) मोठ्या प्रमाणात पेरा होत होता. मात्र काही वर्षांत तेलबियांची उत्पादकता घटली. तसेच हवामानातील बदल आणि वन्यप्राण्यांपासून या पिकांची होणारी नासधूस यामुळे सूर्यफूल, जवसाची पेरणी तर कालबाह्य झाली असून, करडई, तीळ व मोहरी यांचा पेरासुद्धा मोठ्या प्रमाणात घटत गेला आहे.  यंदाच्या रब्बीतील गळीत धान्यासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र फक्त 27 हेक्टर असूनही,  करडई,मोहरी, तीळ यापैकी कुठल्याच गळीत धान्याची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली नाही. याशिवाय केळी व ऊस अनुक्रमे 24 आणि 45 हेक्टरवर तर धने 119 हेक्टरवर आणि भाजीपाला 535 हेक्टरवर पेरल्या गेलेला आहे.


“ किनवट तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीपेक्षा जास्त  पाऊस झाल्याने, रब्बीचे क्षेत्र वाढेल असा अंदाज होताच. अपेक्षेनुसार रब्बीच्या सरासरी क्षेत्रापेक्षा हरभरा पिकाचे क्षेत्र दीडपटीने वाढले असून, गहू, मका व ज्वारी या तृणधान्याच्या पेरणीतही लक्षणीय अशी वाढ झालेली आहे. रब्बीत तिळावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने, या भागातील शेतकरी तिळाची पेरणी उन्हाळी हंगामामध्ये करण्यास जास्त करून प्राधान्य देतात”

 - बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी,किनवट.

No comments:

Post a Comment

Pages