फुले-आंबेडकरी स्त्रीवादाने समग्र स्त्रीमुक्ती शक्य ज्येष्ठ लेखिका डॉ. वंदना महाजन यांचे प्रतिपादन ; कल्चरल'ची फुले -शाहू- आंबेडकर-साठे व्याख्यानमाला : पुष्प दुसरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 11 January 2025

फुले-आंबेडकरी स्त्रीवादाने समग्र स्त्रीमुक्ती शक्य ज्येष्ठ लेखिका डॉ. वंदना महाजन यांचे प्रतिपादन ; कल्चरल'ची फुले -शाहू- आंबेडकर-साठे व्याख्यानमाला : पुष्प दुसरे


नांदेड : जात बदलली की स्त्री प्रश्नाचे स्वरूप बदलत जाते. याचे आकलन फुले आंबेडकर स्त्रीवादाने दिले. जात आणि स्त्री-पुरुष विषमता हे समतेच्या मार्गातील मुख्य अडथळे आहेत असे सांगून जात आणि स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्यासाठी संघर्ष करणाची प्रेरणा देणाऱ्या फुले आंबेडकरी स्त्रीवादाने समग्र स्त्री मुक्ती शक्य आहे. असे प्रतिपादन प्रख्यात लेखिका डॉ. वंदना महाजन (मुंबई )यांनी केले. 

 कल्चरल असोसिएशन नांदेडच्या वतीने फुले -शाहू -आंबेडकर -अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. व्याख्यानाचा विषय   'बहुजनवादी स्त्री चळवळीची दिशा'असा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुप्रिया गायकवाड होत्या. तर यावेळी मंचावर विमलताई नवसागरे, डॉ.  मंदाकिनी माहुरे, डॉ. शीतल गोणारकर आदी मान्यवर. उपस्थित होते. 


 डॉ.  वंदना महाजन यांनी  बुद्ध काळापासून भारतात झालेल्या स्त्रीवादी विचारांचा विकास स्पष्ट केला. फुले -शाहू -आंबेडकर यांनी सर्वसामान्य कष्टकरी बहुजन स्त्रियांच्या  मुक्तीचा विचार मांडला. महात्मा फुलेंनी विचार आणि कृतीतून स्त्री बदलाची चळवळ केली. सत्यशोधक विवाहाच्या माध्यमातून स्त्री-पुरुषांच्या जोडीदार निवडण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. पण आजही हा हक्क आपण आपल्या अपत्यांना देण्यास तयार नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. 

अध्यक्ष समारोप करताना सामाजिक कार्यकर्ता डॉ. सुप्रिया गायकवाड म्हणाल्या, डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या विकास आणि स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन संपूर्ण आयुष्य पणाला लावले. दारिद्र्य आणि अवहेलना यामध्ये खितपत पडलेले स्त्रियांमध्ये त्यांनी आत्मभान जागृत केले. बहुजन स्त्रीवादी चळवळीला नेमकी दिशा देण्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. 


 कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. शितल गोणारकर यांनी करून दिला.  सूत्रसंचालन डॉ. मंदाकिनी माहुरे यांनी केले. तर विमलताई नवसागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages