किनवट,दि.१४ : नगर परिषदेच्या एकूण उत्पन्नातून दिव्यांग व्यक्तीसाठी ५ टक्के राखीव असलेला निधी खर्च करण्यात यावा,अशी मागणी करणारे निवेदन दिव्यांग मुव्हमेंट व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज(दि.१४) नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की,केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार नगर परिषद कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीसाठी नगर परिषदेच्या एकूण जमा उत्पन्नात ५ टक्के निधी राखीव ठेवणे गरजेचे आहे. मात्र, किनवट नगर परिषदेकडून दिव्यांगासाठी खर्च करण्यात येणाऱ्या निधीत आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे. एकूण जमा उत्पन्नाऐवजी अत्यावश्यक खर्च वजा जाता राहिलेल्या रक्कमेतून ५ टक्के निधी खर्च करण्यात येत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.
नगर परिषदेच्या जमा रक्कमेपैकी ५ टक्के निधी दिव्यांगासाठी उपकरणे पुरविणे, घरकुल योजना, व्यवसाय, मनोरंजन केंद्र, विशेष शाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी तसेच दिव्यांग उद्योजकांच्या उद्योग धंद्याकरीता जागा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक तो योजना निधी राखुन ठेवण्यासाठी सूचना आहेत. हा राखीव ५ टक्के निधी दिव्यांगाच्या १९ प्रयोजनार्थ बाबीवर खर्च होणे आवश्यक आहे.
मात्र, नगर परिषद एकूण जमा रक्कमेपैकी अत्यावश्यक खर्च वगळून शिल्लक राहीलेल्या रक्कमेतूनच दिव्यांगावर ५ टक्के निधी खर्च करत आहे. नगर परिषदेच्या एकुण जमा उत्पन्नाच्या ५ टक्के निधी खर्च दिव्यांगाच्या कल्याणकारी कामासाठी झाला तर दिव्यांगाना खन्या अर्थाने न्याय मिळणार आहे.
चालू आर्थीक वर्षातील नगर परिषदेच्या एकूण जमा उत्पन्नाच्या ५ टक्के निधी हा दिव्यांगासाठी उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा आम्हाला नाईलाजाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करावी लागेल तसेच प्रसंगी सक्षम न्यायालयात दाद सूध्दा मागावी लागेल, अशा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर अॅड. मिलिंद सर्पे,अध्यक्ष
दिव्यांग मुव्हमेंट, नांदेड जिल्हा व भगवान मारपवार, अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, किनवट यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनाच्या प्रति सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट व तहसीलदार, तहसील कार्यालय, किनवट यांना देण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment