तिरुपती ‘कृष्णा एक्सप्रेस’ या रेल्वेबाबत प्रवाशांत संभ्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 19 February 2025

तिरुपती ‘कृष्णा एक्सप्रेस’ या रेल्वेबाबत प्रवाशांत संभ्रम


किनवट,  : आदिलाबाद ते तिरुपती व तिरुपती ते आदिलाबाद अशी धावणारी रेल्वे गाडी क्रमांक 17405/17406 या गाडीची टिकीट बुकिंग दिनांक 24 मार्च 2025 नंतर रेल्वेच्या अधिकृत बुकिंग संकेतस्थळावर दाखवत नसल्याने, प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सदर रेल्वे गाडी ही 24 मार्च पासून बंद होणार आहे काय? अशी विचारणा प्रवासी नागरिक करीत आहेत.


      या संदर्भात नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक  यांच्या   सी.यु.जी मोबाईल क्रमांकावर भ्रमणभाषद्वारे काही नागरिकांनी विचारणा केली असता, त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन लवकरच प्रसारीत करुत, असे सांगितल्याचे समजले. आदिलाबाद ते तिरुपती ‘कृष्णा एक्सप्रेस’ ही गाडी आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, बोधडी, भोकर या तालुक्यातील कर्मचारी व नागरिकांसाठी प्रशासकीय,आरोग्य आदी कामांनिमित्त दळणवळणाकरिता लागणारी अत्यावश्यक अशी गाडी.आहे. या रेल्वे गाडीवर अनेक हातावर पोट भरणाऱ्या लहान व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. तसेच ही गाडी तिरुपती  येथे भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता एकमेव अशी गाडी असून, या रेल्वेने दररोज हजारो भाविक स्वस्तात यात्रा करतात.


          सदरील ‘कृष्णा एक्सप्रेस’ वरच आदिलाबाद –नांदेड- आदिलाबाद रेल्वे क्रमांक 17409/17410 ही गाडी अवलंबून असल्यामुळे, ‘कृष्णा एक्सप्रेस’ बंद झाल्यास या इंटरसिटी रेल्वेगाडीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणी दवाखाना, शासकीय कार्यालय, नोकरी, शिक्षणाकरिता किनवट, माहूर, मांडवी, बोधडी, इस्लापूर भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या आदिलाबाद ते नांदेड ‘इंटरसिटी एक्सप्रेस’ या गाडीवर अवलंबून राहतात. आदिलाबाद ते तिरुपती या ‘कृष्णा एक्सप्रेस’ गाडीचे रॅक हे आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस करिता दिवसा वापरले जातात. त्यामुळे दोन्ही गाड्यांच्या भविष्यातील संचालनाबाबत स्पष्टता नसल्याने, रेल्वेकडून या बाबत अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांद्वारे केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages