नागसेनवनातुन सुरू होणार भीमजयंतीचा जल्लोष सलग ९ व्या वर्षी नागसेन फेस्टिव्हलचे भव्य आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 22 March 2025

नागसेनवनातुन सुरू होणार भीमजयंतीचा जल्लोष सलग ९ व्या वर्षी नागसेन फेस्टिव्हलचे भव्य आयोजन


छत्रपती संभाजीनगर : येथील नागसेनवनात भीमजयंतीच्या निमित्ताने नागसेन फेस्टिव्हलचे भव्य आयोजन करण्यात आले असून यंदा सलग ९ व्या वर्षी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने १३४ व्या भीमजयंतीच्या निमित्ताने २८ ते ३० मार्च दरम्यान सायं.०५ ते १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.


यंदाच्या नागसेन फेस्टिव्हलचे उद्घाटन जगप्रसिद्ध छायाचित्रकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते सुधारक ओलवे यांच्या हस्ते २८ मार्च रोजी सायं.०६ वाजता लुम्बिनी उद्यान येथे होणार आहे. फेस्टिव्हलच्या निमित्ताने कला, साहित्य, संगीत आणि विचारांच्या अद्वितीय संगमाचा अनुभव रसिकांना मिळणार आहे.

नागसेन फेस्टिव्हलमध्ये विविध सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कला संगीति, व्याख्यान, परिसंवाद, बहुभाषिक कवी संमेलन, भित्तीपत्रके, मुलाखती, भीमगीत नृत्य, आणि आंबेडकरी रॅप अशा विविध उपक्रमांची रेलचेल असणार आहे.

 नागसेन फेस्टिव्हलचे निमंत्रक सचिन निकम यांनी सांगितले की, "हा महोत्सव जगभरातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणारा एक सशक्त मंच ठरत आहे." या महोत्सवात ३० हून अधिक कलावंतांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन होणार असून, प्रत्यक्ष कलाकृती निर्मितीचा अनुभवही रसिकांना मिळणार आहे. विविध प्रकारच्या पेंटिंग्ज, शिल्पकला आणि इतर माध्यमांच्या कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नागसेन फेस्टिव्हल समितीने या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. 


"ही केवळ कला आणि साहित्याची पर्वणी नाही, तर विचारांचे आणि समतेच्या मूल्यांचे एक अनोखे विचारपीठ आहे," असे आयोजन समितीने स्पष्ट केले आहे.


सुधारक ओलवे यांचे फोटोग्राफी प्रदर्शन मुख्य आकर्षण


नागसेन फेस्टिव्हलमध्ये यंदा सुधारक ओलवे यांच्या फोटोग्राफी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे. शोषित आणि वंचितांचे वास्तव मांडणाऱ्या त्यांच्या छायाचित्रांची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तसेच, प्रसिद्ध चित्रकार आणि अभिनेत्री शुभा गोखले यांच्या कलाकृतींची विशेष प्रदर्शनीही या फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.  सिनेअभिनेते कैलास वाघमारे यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे.



बहुभाषिक कवी संमेलन – विविध भाषांचा संगम

या महोत्सवातील बहुभाषिक कवी संमेलन रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, वऱ्हाडी, अहिराणी, बंजारा आणि आदिवासी अशा विविध भाषांतील आंबेडकरी कविता कवी संमेलनात सादर केल्या जातील. देशभरातील नामवंत कवी आपली कविता सादर करून विचारांची नवी दिशा उलगडून दाखवणार आहेत.


कलासंगीति – कला आणि विचारांचा मंथनसोहळा


कला, गीत, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रातील दिग्गज कलाकार 'कलासंगीति' या विशेष परिसंवादात सहभागी होणार आहेत. लोकशाही, समता, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा जागर या परिसंवादात होईल. कलेच्या वाटचालीवर आणि चळवळीसाठी कलेच्या अपरिहार्यतेवर या मंथनात चर्चा केली जाणार आहे.


लोकशाही, समता आणि स्वातंत्र्याचा जागर


भीमजयंतीचे औचित्य साधून नागसेन फेस्टिव्हलमध्ये लोकशाही, समता आणि स्वातंत्र्य यांचा जागर घालण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव विविध कला आणि साहित्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages