मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना निरोप, नूतन सीईओ मेघना कावली यांचे स्वागत ; नांदेड जिल्ह्याने मला भरभरून प्रेम दिले- मीनल करनवाल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 24 March 2025

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना निरोप, नूतन सीईओ मेघना कावली यांचे स्वागत ; नांदेड जिल्ह्याने मला भरभरून प्रेम दिले- मीनल करनवाल

नांदेड, दि.24 - नांदेड जिल्ह्याने मला भरभरून प्रेम दिले आहे. येथे मिळालेले प्रेम व सहकार्य मी कधीही विसरू शकणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. त्यांच्या सन्मानार्थ आयोजित निरोप समारंभात त्या बोलत होत्या.

      जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे होते. मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मंजुषा कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

       मीनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगताना नांदेड जिल्ह्याच्या संस्कृतीचा व प्रेमळ माणसांचा उल्लेख केला. बालिका पंचायत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, कचरामुक्त गाव, ई-फाइल ट्रॅकिंग यासारखे विविध उपक्रम विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करता आले, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील विकासकामे व शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही मेहनत घेतली. नांदेड जिल्हा माझ्या कायमच्या आठवणीत राहील, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

चौकट

शिस्तीचे पालन आवश्यक – मेघना कावली

        नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी कर्मचाऱ्यांना शिस्तबद्ध काम करण्याचे आवाहन केले. कार्यालयीन वेळेत जबाबदारीने काम केल्यास कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही, असे त्या म्हणाल्या. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या प्रथम विभाग प्रमुखांना सांगाव्यात, तरीही समस्या सुटली नाही, तर त्या थेट माझ्याकडे घेऊन याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात शिस्त निर्माण केली असून, त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रशंसा त्‍यांनी केली. त्‍यांचे उपक्रम पुढेही सुरु ठेवण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. 

       कार्यक्रमाच्या प्रारंभी मीनल करनवाल यांना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने नांदेड येथील प्रसिद्ध गुरुद्वाऱ्याची प्रतिकृती, शाल, साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्‍यक्षीय भाषणात आयुक्‍त महेशकुमार डोईफोडे यांनी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या सोबत निवडणूक जनजागृतीमध्‍ये प्रभावीपणे राबविलेल्‍या उपक्रमाची आठवण करुन दिली. प्रारंभी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी प्रास्ताविक केले, तर मिलिंद व्यवहारे यांनी मीनल करनवाल यांच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. 

     कार्यक्रमात बाबूराव पुजरवाड, व्ही. बी. कांबळे, गजानन शिंदे, धनंजय घुमलवार, वसंतराव वाघमारे, धनंजय वडजे, मधुकर मोरे, कमल दर्डा, शेख मुक्रम, राघवेंद्र मदनुरकर, गणेश आंबेकर व येरगी येथील बालिका पंचायतच्या मधवी दानेवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व विविध विभागाच्‍या संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मिलिंद व्‍यवहारे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages